Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे आणि यासोबतच अनेक वर्षांची प्रतीक्षा देखील संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा विधी पार पडला. वैदिक मंत्रोच्चार आणि अभिजीत मुहूर्तावर रामाच्या बालस्वरुपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज (22 जानेवारी) पार पडली. अयोध्येतील या खास प्रसंगात पंतप्रधान मोदींसह देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुणेही सहभागी झाले होते. अयोध्येत 16 जानेवारीपासून रामललाच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम सुरू होता. 


रामललाच्या अभिषेकानंतर त्यांचा फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये रामललाचे (Ram) रुप अतिशय दिव्य दिसत आहे. आता प्राणप्रतिष्ठा हा शब्द तर आपण सर्वांनी ऐकलाच असेल. मंदिरात देवाची प्रतिष्ठापना करण्याची ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असते. पण प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय, हे तुम्हाला माहीत आहे का? तर मग मंदिरात देवाची स्थापना करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा का केली जाते? जाणून घेऊया.


प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय?


त्स्य पुराण, वामन पुराण आणि नारद पुराणात प्राणप्रतिष्ठेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, हा एक विधी आहे, ज्याद्वारे मंदिरात देव किंवा देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. वेद मंत्रांच्या पठणात मूर्तीची स्थापना केली जाते, यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतं, अशी मान्यता आहे.


प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची?


प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची आहे? हे जाणून घेण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. प्राण या शब्दाचा अर्थ जीवन शक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना. अशाप्रकारे प्राणप्रतिष्ठेचा शाब्दिक अर्थ जीवन शक्तिची स्थापना करणे असा होतो. प्राणप्रतिष्ठेनंतर देव किंवा देवीच्या मूर्तीची पूजा करणं आवश्यक आहे. असं मानलं जातं की, प्राणप्रतिष्ठेनंतर देव किंवा देवतेच्या स्थापन केलेल्या मूर्तीची पूजा केली नाही तर तिची शक्ती कमी होते.


मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याची प्रक्रिया काय?


विधीच्या सुरुवातीला मूर्तीला सन्मानाने आणलं जातं. मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पाहुण्यासारखं तिचं स्वागत केलं जातं. मग त्यावर सुवासिक वस्तूंचा लेप लावला जातो, मूर्तीला दुधाने आंघोळ घातली जाते, मग मूर्ती स्वच्छ केली जाते आणि अभिषेक करण्यायोग्य बनवली जाते. त्यानंतरच्या प्रक्रियेत मूर्तीला गर्भगृहात ठेवून पूजा सुरू होते. पूजेदरम्यान मूर्तीचं तोंड पूर्वेकडे असतं. मूर्ती योग्य ठिकाणी स्थापित केल्यानंतर मंत्रोच्चार करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडते.


पूजा केल्यानंतर सर्व प्रथम मूर्तीवर बांधलेली पट्टी काढून डोळे उघडतात, त्यानंतर डोळ्यात मध टाकले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीमध्ये एक दिव्य जिवंतपणाची अनुभूती येते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ram Mandir : देशातील सर्वात मोठी 10 राम मंदिरं माहितीये? 'या' राम मंदिरात भगवान कृष्ण करायचे रामलल्लाची पूजा