नागपूर : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी विदर्भाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केलीये. या संदर्भात अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी अधिवेशन (Assembly Winter Session) पूर्णवेळ म्हणजेच 3 आठवड्यांचे करण्याची मागणी केलीये. राज्याचं हिवाळी अधिवशेन हे नागपुरात म्हणजेच विदर्भातील (Vidarbha) एका महत्त्वाचा जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळेच विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अमोल मिटकरींनी ही मागणी केलीये. 


हे हिवाळी अधिवेशन विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांची बेरोजगारी, उद्योगधंद्यांच्या बाबतीत असलेला मागासलेपणा या सर्व बाबींवर चर्चा व्हावी. तसेच विदर्भाचा शाश्वत विकास देखील व्हावा अशी मागणी देखील याद्वारे अमोल मिटकरी यांनी केलीये. त्यासाठी अधिवेशन पूर्ण वेळ चालवण्यात यावे  आणि विदर्भाच्या प्रश्नांवर प्राधान्य देण्यात यावे, असं अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय. 


विदर्भाच्या मुद्द्यावर अधिवेशनात पत्रकार गॅलरीतून घोषणाबाजी


विधानसभेमध्ये चर्चासत्र सुरु असताना पत्रकार गॅलरीमधून विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या घोषणा एका वृत्तपत्राच्या संपादकांनी दिल्या. हे संपादक विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते देखील आहेत. त्यावेळी आशिष शेलार यांनी विधानसभेत भाषणाला सुरुवात केली होती. सुरु असलेलं चर्चा सत्र थांबवून विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. यावर आशिष शेलार यांनी या संपादकांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान तात्काळ तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले. 


या संपादकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. बुधवार 13 डिसेंबर रोजी संसदेत देखील असाच काहीसा प्रकार घडला. त्यानंतर विधानसभेत घडलेल्या या प्रकारावर विधानसभेत उपस्थित असणाऱ्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालिका अध्यक्षांनी निर्देश दिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संपादकांना तात्काळ सभागृहाच्या बाहेर काढले. दरम्यान यावेळी या संपादकांनी अधिवेशनाच्या कामकाजावर देखील भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. आता या मुद्द्यावर विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा : 


विधानसभेत पत्रकार गॅलरीत घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार, आमदार आशिष शेलार यांच्या मागणीवर निर्देश