मुंबई : 28 डिसेंबर रोजी नागपुरात (Nagpur) काँग्रेसचा (Congress) 139 वा स्थापना दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नागपुरात पक्षातर्फे मोठी रॅलीही आयोजित केली जाणार असून, त्यात पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणूक2024 चे (Loksabha Election 2024) बिगूलही वाजवेल असं सांगण्यात येत आहे. 


काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देखील स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रॅलीत सहभागी होतील. यामध्ये 10 लाखांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. 


'केंद्रात भाजपच्या काळात दोनदा संसदेवर हल्ले झाले'


दरम्यान, वेणुगोपाल यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून भाजपवर निशाणा साधला आणि संसदेवर दोनदा हल्ला झाल्याचे सांगितले. केंद्रात भाजपची सत्ता असताना हे दोन्ही हल्ले झाले. संसदेत काय चालले आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे, असेही ते म्हणाले. भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवालही काँग्रेस नेत्याने केला. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीला जनता कंटाळली आहे.


वेळ आल्यावर गृहमंत्री सर्व उत्तर देतील - गिरीराज सिंह 


विशेष म्हणजे संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत विरोधी पक्ष सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदन देण्याची मागणी करत आहेत. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते गिरिराज सिंह यांनी वेळ येऊ द्या, ते प्रत्येक गोष्टीचे उत्तर देऊ, असं म्हटले आहे. विरोधकांना संसद गहाण ठेवायची आहे. त्यांनी ट्वीट करत विरोध पक्षांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, विरोधक गृहमंत्र्यांकडे जाब विचारत आहे. तपास पूर्ण होऊ द्या, तुम्हाला चोख उत्तर मिळेल. 


भाजपचा मेगाप्लान तयार


 लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला असल्याची माहिती समोर आलीये. भाजपचा हाच मेगाप्लान एबीपी माझाच्या हाती लागलाय. 55 दिवसांता आचारसंहिता लागणार असून सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


हेही वाचा :


लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगाप्लॅन , 55 दिवसांत आचारसंहिता लागणार, आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना