E-Panchnama : नैसर्गिक आपत्तीमुळं शेतीचं नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, ही भरपाई मिळण्यास वेळ लागत होता. मात्र, आता ई पंचनामा (E-Panchnama) केल्यामुळं शेतकऱ्यांना (Farmers) अधिक जलद गतीनं मदत पोहोचू शकणार आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात ई पंचनाम्याचे प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाले आहेत.


शेतीच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करणं शक्य होणार


काल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं मोठं नुकसान होतं. नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी पूर्वी वेळ लागत होता. आता मात्र, पंचनामा करुन सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना मिळणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्व विदर्भात (म्हणजेच नागपूर विभागात) ई पंचनाम्याचा प्रयोग राबवण्यात आला होता. साधारणपणे अतिवृष्टी झाल्यानंतर महसूल विभागाचे तलाठी आणि कृषी विभागाचे कृषी सेवक काही निवडक शेतावर जाऊन पंचनामे करायचे. त्यामुळं अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहायचे आणि पंचनामा आणि नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया नेहमीच वादात राहायची. अनेक वेळेला तलाठी आणि कृषी सेवक त्यांच्या कार्यालयात बसूनच पंचनामे करतात असे आरोपही व्हायचे. मात्र ई-पंचनामा प्रक्रियेमध्ये तलाठी आणि कृषी सेवकांवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन जीपीएस तंत्राद्वारे शेतीच्या नुकसानीची माहिती ॲपवर भरणे, नुकसानीचा प्रत्यक्ष फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  त्यामुळं शेतीच्या नुकसानीचे अचूक पंचनामे होणे शक्य झाले आहे.


ई-पंचनामा केल्यामुळं वेळ वाचणार, तात्काळ मदत मिळणार


नागपूर जिल्ह्यात ई-पंचनामाची प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली आहे. 1 हजार 185 हेक्टर जमिनीचे ई-पंचनामे त्वरित करण्यात आले. आज 1 हजार 485 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा  अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. तलाठी आणि कृषी सेवकांनी ई-पंचनामे केल्यानंतर अवघ्या एका क्लिकवर ई-पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त पातळीवर एक एक टप्पा समोर गेला. अवघ्या काही मिनिटातच राज्य सरकारला सादरही करण्यात आला. आधी या प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागायचा. त्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास उशीर व्हायचा. ई पंचनामामुळे साठ ते सत्तर टक्के वेळ वाचेल असा प्रशासनाचा दावा आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


E Panchnama : नागपूर विभागात प्रायोगिक तत्त्वावर ई-पंचनामा मोहीम, कमी वेळात अचूक पंचनामा; 10 ते 15 दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळणार