Nagpur News : प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर पोलिस दररोजच कारवाई करीत आहेत. लाखोंचा प्रतिबंधित मांजा जप्तही केला जातो. त्यानंतरही हा मांजा शहरात येतो कुठून? असा प्रश्न विचारला जातोय. पशू-पक्षांसह मानवासाठीही जीवघेणा असलेला हा मांजा शहरात येत असेल तर यासाठी कोण जबाबदार आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अपयश यासाठी कारणीभूत तर नाही. असे एक नाही अनेक प्रश्न एक दिवसापूर्वीच फारुकनगरात नायलॉन मांजामुळे एका 5 वर्षांच्या चिमुकलीचा गळा चिरल्याच्या घटनेने निर्माण झाले आहेत.
सुदैवाने मुलीचे प्राण वाचले. मात्र या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेषत: वाहन चालकांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. कधी कुठून एखादा मांजा येऊन गळ्यात अडकेल आणि गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. लोकांचे जीवावर बेतत असतानाही पोलिस व प्रशासन नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई का करत नाही असा प्रश्नही आता नागरिक विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे उच्च न्यायालयानेही पोलिसांच्या (Nagpur Police) कारवाईवर नाराजी व्यक्तही केली आहे.
उड्डाणपुलांवर सुरक्षेचे उपाय नाही
मकरसंक्रांत जवळ येताच पतंगबाजीला उधाण आले असून मांजाची मागणी वाढली आहे. आपली पतंग कटू नये म्हणून पतंगबाजांकडून चायनीज मांजाचा वापर होत आहे. यामुळे लोकांचा जीव धोक्यात येत असला तरी त्यांना याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. विशेषत: वाहन चालक मांजामुळे होणाऱ्या अपघातांना बळी पडतात. गळ्यात मांजा अडकून अनेकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागते. कधी-कधी यामुळे एखाद्याचा जीवही जातो. वाहन चालकांना मांजामुळे होणाऱ्या अपघातांपासून वाचविण्यासाठी शहरातील उड्डाण पुलांवर दोन्ही बाजूला विजेच्या खांबांना तार बांधून सुरक्षा घेरा बनवला जातो. मात्र यावर्षी मकर संक्रांतीला केवळ 5 दिवस शिल्लक असतानाही पोलिस विभागाकडून अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यावरून पोलिस आणि प्रशासन लोकांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही असे दिसून येते किंवा त्यांना आत्मविश्वास आहे की, यावेळी नायलॉन मांजाच्या विक्रीवर ते पूर्णत: प्रतिबंध लावण्यात यशस्वी ठरतील.
अद्यापही आरोपी अज्ञातच
अनेक वर्षांपासून शहरात चायनीज मांजाची विक्री होत आहे. या मांजाने अनेकांना गंभीर दुखापतही आली. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हेही नोंदविले, मात्र आजपर्यंत आरोपी अज्ञातच आहेत. एकाचा ही शोध लावून शिक्षा मिळवून देता आली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मांजाच्या आधारावर कोणालाही आरेापी करता येऊ शकत नाही, कारण मांजा कोणाचा होता? हे माहितीच होऊ शकत नाही.
...तर चालवावा बुलडोझर
उल्लेखनीय आहे की, शेजारचे राज्य मध्यप्रदेशच्या उज्जेनमध्ये प्रतिबंधित मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मांजा विकणाऱ्या आणि तस्करी करणाऱ्यांची घरे जमिनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या आदेशाला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे एका तस्कराचे घर जमिनदोस्त करण्यातही आले आहे. अशात बेघर होण्याच्या भीतीने अनेकांनी चायनीज मांजाची विक्री व तस्करीपासून स्वत:ला दूर केले आहे. अशाच प्रकारची कारवाई शहरातही करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पोलिस आयुक्तांनी केले आवाहन
हायकोर्टाच्या निर्देशावर संपूर्ण महाराष्ट्रात नायलॉन मांजाची विक्री आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना शहरात कुठेही नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा होत असल्याचे दिसून आले तर 9823300100, 100 आणि 112 वर कॉल करून पोलिसांना सूचना देण्यात यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
ही बातमी देखील वाचा...