APMC Nagpur News : एपीएमसी (APMC) कळमन्यात दोन महिन्यांपूर्वी आगीची भीषण घटना घडली होती. या आगीमुळे मार्केट प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वर्षांपासून मार्केटमध्ये आग विझवण्यासाठी सुविधाच नसल्यानं आगीच्या घटना घडून लाखो रुपयांच्या मालाची राखरांगोळी होत असल्याचा आरोप झाला. आता घटनेच्या दोन महिन्यानंतर मार्केट प्रशासन आणि नवनिर्वाचित अध्यक्षांना जाग आली आहे. गेल्या आठवड्यात यार्ड प्रशासनाने अग्निशमन उपकरणांसाठी 7 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मंजुरीसाठी डायरेक्टर मार्केटिंगला प्रस्तावही पाठविल्याची माहिती आहे.  


हायड्रेंट, जलकुंभ आदींची तरतूद 


सूत्रांनी सांगितले की, फायर फायटिंगकरता वेगळी पाण्याची टाकी तयार करण्यात येणार आहे. या टाकीतून संपूर्ण परिसरात हायड्रेंट आणि पाईपने जोडण्याची योजना आहे. मार्केटमध्ये सर्व ठिकाणांवर फायर एक्सटिंग्यूशर लावण्याचीही योजना आहे. ही सर्व कामे या निधीतून केली जाणार आहे. 


पर्याप्त सुविधा नाही


कळमना चिल्ली मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महेश बांते यांनी सांगितले की, जळून राख झालेल्या शेडच्या ठिकाणी स्थायी शेड आणि अन्य मूलभूत सुविधांची मागणी असोसिएशन अनेक वर्षांपासून करत आहे. पिण्याचे पाणी, क्लियर अप्रोचेबल रोड यासुद्धा सर्वात मोठ्या समस्या आहेत. यावरही मार्केट प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आता आगीच्या घटनेच्या 2 महिन्यानंतर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याला वास्तविक रुपात आणण्यासाठी मात्र किती वर्ष लागेल, यावर प्रश्नचिन्ह आहे.


तब्बल 17 कोटींची मिरची झाली होती खाक


नागपुरातील कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामाला 23 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास आग लागली होती. या आगीत अंदाजे सतरा कोटींची मिरची जळून खाक झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं होतं. मिरचीला लागलेल्या आगीने निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला होता. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली होती.


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. साडेसहा ते सात तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं. आगीत नुकसान झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मिरचीच्या व्यवहारातून बाजार समितीला पाच कोटींचं उत्पन्न मिळतं. यानंतरही घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा दाखल झाली नव्हती, हे विशेष. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


'त्या' हत्याकांडातील शुटरला सहा वर्षांनंतर अटक; भुखंडाच्या वादातून आर्किटेक्टवर झाडल्या होत्या गोळ्या