Nagpur News : दर महिन्याला 20 ते 30 अधिकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती आणि नवीन पदभरती अद्याप सुरु झाली नसल्याने नागपूर महापालिकेत 60 टक्के पदे रिक्त आहेत. तरी महापालिकेचा आस्थापना खर्च 50 टक्क्यांवर असल्याने महापालिका आवश्यक पदांची पदभरती करू शकत नाही. विशेष म्हणजे, महापालिका (Nagpur Municipal Corporation) सध्याच्या घडीला 9 हजारांहून अधिक निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेंशन देते. त्यांच्यावर 17 कोटी रुपयांचा दर महिन्याला खर्च होत असल्याची माहिती आहे.


महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याचे कारण सांगून गेल्या 12 वर्षांपासून पदभरती बंद आहे. महापालिकेत 60 टक्के पदे रिक्त असून, 3 हजार पदांचा अनुशेष आहे. गेल्या काही वर्षांपासून मनपातील पाणीपुरवठा, शहर बस वाहतूक, कचरा संकलन, रस्ते बांधकाम, कर निर्धारण, उद्यान विभागाची सर्व महत्त्वाची कामे खासगी कंपन्यांकडून करण्यात येत आहेत. मनपात निवृत्तीनंतर रिक्त होणारी पदे भरली जात नाहीत.


दर महिन्याला कर्मचारी निवृत्त


दर महिन्यात महापालिकेत (NMC) 20 ते 30 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतात. 2020-21 या वर्षात 510 कर्मचारी- अधिकारी सेवानिवृत्त झाले. 2021-22 मध्ये 430 तर चालू 414 कर्मचारी निवृत्त झाले असून, अजूनही दोन महिने शिल्लक आहे. आतापर्यंत निवृत्तीधारकांची संख्या नऊ हजारांवर गेली असून, त्यांच्या पेंशनवर दरमहा 17 कोटी खर्च होत आहे. मनपात 60 टक्के पदे रिक्त असताना मनपाचा आस्थापना खर्च 50 टक्क्याच्या वर असल्याचे कारण सांगून, केवळ 85 पदांची भरती करण्याचे आदेश दिले, असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


पालिकेत कार्यरत कर्मचारी कर्मचारी संघटनांकडून रिक्त


पदांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 60 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत. महापालिकेत 7,162 कर्मचारी व अधिकारी आस्थापनेवर आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, आर्थिक मागास आदींकरिता 5001 पदे मंजूर असून, त्यापैकी 1942 कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित 3039 पदे रिक्त आहेत. याप्रमाणेच खुला प्रवर्गातील 2,062 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 717 पदे भरलेली असून, उर्वरित 1345 पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्च 35 टक्क्यांहून अधिक नको, असे राज्य शासनाचे स्थायी आदेश आहेत. त्यामुळे मागील 12 वर्षापासून मनपामध्ये स्थायी पदावर नोकर भरती करण्यात आलेली नाही.


युवक बेरोजगार, निवृत्त कर्मचारी सेवेत


नागपूर महानगरपालिकेच्या अनेक विभागात निवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे नोकरभरती थांबली असल्याने शहरातील हजारो तरुण मिळेल ते काम करुन आपल्या आयुष्यातील उमेदीचे काळ घालवत आहे.


ही बातमी देखील वाचा...


Nagpur News : नागपुरात ग्रीन जीमच्या देखभालीकडे दुर्लक्ष ; उद्यानात उरले लोखंडांचे सांगाडे