Nagpur News : सार्वजनिक ठिकाणी मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालताना आढळून आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर मनापाद्वारे 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Bombay High Court Nagpur Bench) दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्यावतीने (NMC) करण्यात आले आहे.
...अन्यथा कठोर कारवाई
मोकाट कुत्र्यांमुळे नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. शहर आणि लगतच्या परिसरातील कुणीही व्यक्ती/रहिवाशी मोकाट/भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, इत्यादी ठिकाणी अन्न खाऊ घालणार नाही. मोकाट/भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींनी स्वत:च्या घराच्या व्यतिरीक्त इतर कुठल्याही ठिकाणी अन्न खाऊ घालू नये, असे परिपत्रकात म्हटले आहे.
दत्तक घ्या, मनपाकडे नोंदणी करा!
कोणी व्यक्ती मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालण्यास इच्छुक असेल त्यांनी त्या मोकाट/भटक्या कुत्र्यांना प्रथम दत्तक घ्यावे, त्यांना घरी आणावे, त्यांची महानगरपालिकेमध्ये रीतसर नोंद करुन घ्यावी किंवा त्यांना डॉग शेल्टरमध्ये ठेवावे आणि त्यानंतर त्यांच्यावर प्रेम करावे, यासह त्यांचे लसीकरण आणि आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घ्यावी, असे आदेश पारित केले आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
मनपाच्या सोशल मीडियावर पाठवा फोटो
नागपूर महानगरपालिकाद्वारे या संदर्भात उपाययोजना राबवित उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करुन सार्वजनिक ठिकाणी मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळुन आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास मोकाट / भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर 200 रुपये दंड आकारून वसूल करण्यात येईल, नागरिकांना निर्देशित केले आहे. तसेच मोकाट / भटक्या कुत्र्यांना पकडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या पथकाला कुणीही व्यक्तींनी अडथळा निर्माण केल्यास संबंधीतांविरुध्द प्रचलित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. तरी शहरातील त्रासदायक मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी मनपाच्या समाज माध्यमांवर (Social Media) पाठवावी व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता मनपाचे सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी नागरिकांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या