Samruddhi Mahamarg Nagpur News : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी राज्यातील वाहतूक पोलिसांना आणखी 194 इंटरसेप्टर वाहनांची गरज आहे. त्यासाठीचा प्रस्तावही सरकारदरबारी पडून आहे. परिणामी अत्यंत कमी इंटरसेप्टर वाहनांद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांना काम करावे लागत आहे. ही वाहने आल्यास अशा बेशिस्त वाहनांवर लगाम घालता येईल. तसेच, समृध्दी महामार्गासाठीही पोलिसांनी रस्ते विकास महामंडळाकडे 15 इंटरसेप्टर वाहनांची मागणी केली आहे. ही वाहने पुरविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 


कोविडपासून प्रस्ताव पडून...


वाहतूक पोलिसांनी इंटरसेप्टर वाहनांचा पाठवलेला प्रस्ताव कोरोनाकाळापासून रखडला आहे. त्यामुळे अत्यंत कमी इंटरसेप्टर वाहनांद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिसांना करावे लागत असून वाहतूक पोलीस इंटरसेप्टर वाहनांच्या प्रतीक्षेत आहेत. वाहनचालक महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करून भरधाव वेगात वाहने चालवतात. वेगमर्यादेच्या उल्लंघनामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अनेक वाहनचालक मद्यपान करून वाहने चालवतात. त्यामुळेही अपघाताना आमंत्रण मिळते. महामार्ग असो वा अन्य रस्ते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. राज्यातील मुंबई, नवी मुंबईसह अन्य शहर पोलिसांनाही ही वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच महामार्ग वाहतूक पोलिसांकडेही इंटरसेप्टर वाहने आहेत.


राज्याला हवीत 194 इंटरसेप्टर वाहने


राज्यातील वाहतूक पोलिसांकडे सध्या 96 इंटरसेप्टर वाहने असून यापैकी 62 वाहने महामार्ग वाहतूक पोलिसांकडे आहेत. राज्यातील वाहतूक पोलिसांना आणखी 194 इंटरसेप्टर वाहनांचीही गरज असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र त्यावर विचारविनिमय झालेला नाही. कोरोनाकाळात हा प्रस्ताव रखडला. त्याचा अद्यापही विचार झाला नसल्याची माहिती वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


समृद्धीवर धावताहेत 8 इंटरसेप्टर वाहने


सध्या या वाहनांच्या कमतरतेमुळे समृद्धी महामार्गावर कारवाई करताना अडचणी येतात. समृद्धी महामार्गावर  वाहतूक नियोजन आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नागपूर, औरंगाबाद, पुणे विभागातील वाहतूक पोलिसांवर तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यातील लेझर स्पीड गन, अल्कोहोल ब्रेथ अ‍ॅनलायझर यासह अन्य यंत्रणा असलेल्या आठ इंटरसेप्टर वाहनांचा कारवाईसाठी वापर केला जात आहे. 


अशी असते इंटरसेप्टर वाहने


या वाहनांमध्ये स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. त्यामुळे ऊन-वारा, पावसाचा परिणाम पोलिसांच्या स्पीडगन कारवाईवर होत नाही. याशिवाय कारवाईसाठी सीसी टीव्ही कॅमेरे, ब्रीद अ‍ॅनलायझर, इ-चलान यंत्रणाही आहे.


महामार्गावरील अपघतांची कारणे...



  • भरधाव वाहन चालत असताना टायर फुटून अपघात होणे.

  • रस्त्यावर आलेल्या वन्य प्राण्यांना धडकून अपघात होणे.

  • वाहन चालकाला झोप आल्यामुळे अपघात होणे

  • वाहन नादुरुस्त होऊन अपघात होणे

  • अती वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात

  • मद्य सेवन करून वाहन चालवल्यामुळे अपघात 


ही बातमी देखील वाचा...


Vande Bharat Express : अल्पवयीन मुलांची वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक; सहा मुलं ताब्यात