Vande Bharat Express Nagpur: रेल्वे गाड्यांवर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई सुरू असतानाही या घटना थांबल्या नसून रविवारी पुन्हा वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना घडली आहे. नागपूर-बिलासपूर या वंदे भारत ट्रेनवर कळमना-कामठीजवळ दगडफेकीची घटना घडली. यात ट्रेनची काच फुटल्याने रेल्वेचे नुकसान झाले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यांत नागपूर स्थानकावर (Nagpur Railway Station) वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तेव्हापासून ही हायस्पीड रेल्वे नागपूर ते बिलासपूर आणि बिलासपूर ते नागपूर रेल्वे मार्गावर प्रवाशांना सेवा देत आहे. नेहमीप्रमाणे काल (रविवारी) दुपारी ही गाडी बिलासपूर मार्गावर धावत असताना नागपूरपासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कळमना-कामठी दरम्यान, कोच क्रमांक सी 6 तसेच कोच क्रमांक सी 10च्या खिडकीवर दगड येऊन पडल्याने प्रवासी हादरले. उपनिरीक्षक सागर ठाकरे, रूपेश बनसोड आणि राहुल पांडे तसेच विवेक मेश्राम यांनी रेल्वेच्या वरिष्ठांना ही माहिती देऊन आरोपींची शोधाशोध सुरू केली.


घटनास्थळ परिसरात विचारपूस केली असता रेल्वे लाइनच्या बाजूला खेळणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांनी खेळता खेळता हे दगड गाडीकडे फेकल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या इतवारी ठाण्यात अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


यापूर्वीही अनेक गाड्यांवर दगडफेक; 18 जणांवर कारवाई


वंदे भारत एक्स्प्रेससह (Vande Bharat Express) इतरही रेल्वे गाड्यांवर दगडफेक केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरातून सुटणाऱ्या कोलकाता मार्गाने जाणाऱ्या गाड्यांवर रूळाशेजारी उभं राहून काही मुलांनी गाड्यांवर दगडफेक केली होती. यात वंदे भारत एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस आणि मालगाड्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 18 वेळा दगडफेक झाली. या घटनेत काही प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी जखमीसुद्धा झाले होते. त्यामुळे दगडफेक कुठे आणि कोणी केली याचा तपास करून 18 जणांवर कारवाई केली आहे. तसेच, या सर्वांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. दगडफेक करणाऱ्यांची माहिती त्वरित आरपीएफला (RPF) द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दगडफेक करणे, रेल्वे संपत्तीचे नुकसान करणे या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास पाच वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nagpur News : फुटाळा फाऊंटनच्या उद्घाटनाला पंतप्रधान येणार ; फेब्रुवारीत कार्यक्रम, अनेक मान्यवरांशीही संपर्क