नागपूर : नागपुरात 1920 साली पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहे. शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन नागपूरच्या सीमेवरील भागात झालेला काँग्रेसचे ते अधिवेशन अनेक अर्थांनी ऐतिहासिक होतं. तसेच काँग्रेससह देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारा ही घटना होती. या अधिवेशनात महात्मा गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहिले होते. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार देखील अधिवेशनात उपस्थित राहिले होते. दुर्दैव म्हणजे या ऐतिहासिक अधिवेशनाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना नागपूर काँग्रेस कमिटीला त्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.


ऐतिहासिक घटनेला शंभर वर्ष होत असतानाही काँग्रेस नगर भागात अद्यपापर्यंत कोणतीही हालचाल दिसत नाही. नागपुरात या अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काँग्रेसकडून कोणतेही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेले नाहीत.
त्या अधिवेशनामुळे नागपूरच्या एका भागाचे नाव काँग्रेस नगर असे पडले :


वर्तमान नागपूर शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजे काँग्रेस नगर. 1920 साली हा भाग तत्कालीन नागपूर शहराच्या (महाल आणि परिसराच्या) वेशीवर असलेला मोकळा भाग होता. 1920 साली जेव्हा नागपुरात अधिवेशन घेण्याचे तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी ठरविले. तेव्हा शहराला लागून असलेल्या याच मोकळ्या भागाची निवड अधिवेशनासाठी करण्यात आली. तेव्हापासून तत्कालीन नागपूरच्या वेशीवरील तो भाग काँग्रेसनगर म्हणून ओळखला जाऊ लागला. आतातर काँग्रेस नगरचा हा भाग नागपूरच्या प्रमुख भागांपैकी एक बनला आहे.



1920 सालचे अधिवेशन काँग्रेससाठी कसे महत्वाचे होते?


26 डिसेंबर ते 31 डिसेंबर 1920 या कालावधीत काँग्रेसचं अधिवेशन नागपुरात पार पडले. तो काळ काँग्रेससाठी आणि देशाच्या इतिहासासाठी अत्यंत महत्वाचा काळ होता. नागपूर अधिवेशनाच्या अवघ्या काही महिन्यांआधी म्हणजेच 1 ऑगस्ट 1920 रोजी काँग्रेस पक्षाच्या जहाल गटाचे सर्वोच्च नेते लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला होता. काँग्रेस हळूहळू महात्मा गांधी यांच्या वैचारिक दिशेने मार्गक्रमण करू लागली होती. रौलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ या एका मालिकेने घडलेल्या घटनांमुळे महात्मा गांधींसह काँग्रेस नेत्यांचा इंग्रजांबद्दलचे धोरण हळूहळू बदलत होते. त्याच मालिकेत महात्मा गांधी यांनी मांडलेल्या असहकार चळवळीच्या कार्यक्रमावर नागपूरच्या अधिवेशनात शिक्कामोर्तब करत त्याची गती आणखी वाढवण्याचे ठरले होते. शिवाय काँग्रेस पक्षाला सर्वसामान्यांचा पक्ष बनवण्यासाठी काँग्रेसच्या सदस्य शुल्कात कपात करून ते अवघे 25 पैसे एवढे कमी करण्यात आले होते. याच अधिवेशनात काँग्रेसने हिंदी भाषेला संपर्क भाषेच्या स्वरूपात प्रोत्साहन देण्याचे प्रस्ताव पारित केले होते. भाषावार प्रांत रचनेच्या मुद्द्यावरही काँग्रेस नेत्यांनी या अधिवेशनात मंथन करत अनुकूलता दर्शविली होती.



1920 चे अधिवेशन आणि स्वराज्याची मागणी


याच अधिवेशनात काँग्रेस पक्षाने 1906 पासून सुरु असलेल्या स्वराज्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत त्याचा विस्तार केला होता. जमल्यास ब्रिटिश वसाहती अंतर्गत नाही तर ब्रिटिशांच्या विना स्वराज्य मिळविणे हे काँग्रेस पक्षाचे ध्येय राहील असे काँग्रेसने याच अधिवेशनात जाहीर केले होते. त्यामुळे 1885 पासून ब्रिटिशांना फारसं विरोध न करणाऱ्या काँग्रेसने पहिल्यांदाच ब्रिटिश वसाहतीच्या बाहेर राहून स्वराज्य मिळवण्याची भाषा केल्याने तत्कालीन स्वातंत्र्य लढ्याला एक नवी धार मिळाली होती. याच अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कोलकात्यातून नागपूरला आलेले डॉ. केशव बळीराम हेडगेवार हेही उपस्थित राहिले होते. त्यांनी मात्र याच अधिवेशनात स्वराज्य ऐवजी पूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, तेव्हा स्वराज्य हेच काँग्रेसचे धोरण मानणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी हेडगेवारांचा प्रस्ताव मान्य केला नव्हता. 1920 च्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार यांनी भारत सेवक मंडळ याला नावाने स्वयंसेवकांची फळी उभी करत त्याच्या माध्यमातून त्या काँग्रेस अधिवेशनाची व्यवस्था ही सांभाळली होती. काँग्रेस पूर्ण स्वातंत्र्याच्या प्रस्तावाला मान्यता देत नाही हे लक्षात आल्यानंतर आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून केले जाणाऱ्या सेवाकार्याचा अनुभव आल्यानंतर डॉ. हेडगेवारांनी तेच कार्य पुढे नेण्याचे ठरविले आणि 1925 साली त्याच विचारातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्याचे मत अनेक विचारवंत व्यक्त करतात.



1920 चे अधिवेशन आणि महात्मा


1920 च्या ऐतिहासिक अधिवेशनात उपस्थित असलेल्या बॅरिस्टर जिना यांनी भाषण देताना गांधी यांना उद्देशून "महात्मा गांधी" या शब्दाऐवजी "मिस्टर गांधी" असे संबोधन केले होते. असे सांगितले जाते की तेव्हा नागपूरच्या अधिवेशनात उपस्थित असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गांधीजींसाठी "महात्मा" शब्दाचाच वापर करावा असा आग्रह धरत घोषणा दिल्या होत्या. मात्र, जिना यांनी आपले संबोधन बदलण्यास नकार दिल्यामुळे वाद वाढू नये म्हणून खुद्द महात्मा गांधींनी उभे राहत प्रत्येकाने "महात्मा" हेच सन्मान सूचक शब्द वापरावे हे आवश्यक नाही. "मिस्टर गांधी" या शब्दात काहीच गैर नाही. जोवर कोणी अपमानास्पद बोलत नाही तोवर त्याला शब्द निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे असे मत व्यक्त करत वादावर पडदा टाकला होता.


आता एवढ्या अर्थांनी ऐतिहासिक ठरलेल्या त्या अधिवेशनाबद्दल शंभर वर्षानंतर नागपुरात कोणतीच हालचाल नाही. सध्याच्या ज्या धंतोली गार्डनच्या जागेवर 1920 साली हे अधिवेशन पार पडले होते. तसेच जे काँग्रेस नगर भागाचे नाव या अधिवेशनामुळे पडले, त्या भागात बहुतांशी जनतेला त्या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे, याची जाणीव ही नाही. एवढेच नाही तर नागपूर शहर काँग्रेसतर्फेही त्या भागात कोणत्याही कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशाच्या आणि काँग्रेसच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या त्या अधिवेशनाला नागपूर आणि नागपुरातील काँग्रेस पक्ष विसरला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.