Nagpur News : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेऊन  नागपूर पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या उड्डाणपूलांवर वाहतूक  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी नागपुरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवल्या जातात. मात्र पतंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे आणि खास करून प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे उड्डाण पुलावरील दुचाकी स्वार यांचा जीव धोक्यात येतो. परिणामी, अपघातांची शक्यता टाळण्यासाठीच पोलिसांनी नागपूर शहरातील महत्वाचे उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पोलीसांनी बाईकला सेफ्टी आर्च  लावून बाहेर पडण्याचे आवाहन ही दुचाकी चालकांना केले आहे. दुचाकी स्वरांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटसह स्कार्फ लावण्याच्या सूचना ही पोलिसांनी दिल्या आहेत.  


या उड्डाणपुलांवर आज वाहतूक बंद


 1)शहीद आदिवासी गोवारी स्मारक उड्डाणपूल 


2) सक्करदरा उड्डाणपूल 


3) कडवी चौक ते सदर 


4) मानकापूर उड्डाणपूल 


5) वाडी उड्डाणपूल 


6) पारडी उड्डाणपूल 


7) पाचपावली उड्डाणपूल


पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांकडून ड्रोनद्वारे विशेष लक्ष 


मकरसंक्रांतीला नागपुरात पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलिस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार आहे. पतंगबाजी करताना अनेक लोक नायलॉन मांजाचा वापर करतात आणि त्यामुळे वाहन चालक तसेच पक्षी जखमी होण्याच्या अनेक घटना घडतात. अशाच दुर्दैवी घटना टाळण्यासाठी पोलिसांनी यंदा पतंगबाजांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या अंतर्गतच घरांच्या छतावरून तसेच खुल्या मैदानातून पतंगबाजी करणारे नायलॉन मांजाचा वापर तर करत नाही ना, हुल्लडबाजी तर करत नाही ना, यावर नजर ठेवण्यासाठी नागपूर पोलीस ड्रोनचा वापर करत आहे.


या कारवाईमध्ये जर कोणी ही पतंगबाज नायलॉन मांजा वापर करताना आढळले तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असून रीतसर गुन्हे दाखल केले जाणार आहे. अशी माहिती नागपूर पोलिसांच्या जोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे.


नागपूर पोलिसांकडून सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक 


शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री होऊ नये आणि त्याचा कोणी वापर करू नये यासाठी नागपूर पोलिसांनी सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक ही तयार केले असून ते पतंगबाजांवर करडी नजर ठेवणार आहे. एवढेच नाही तर पोलीस उदघोषणा प्रणालीद्वारे शहरातील विविध भागात नायलॉन मांजा वापरू नये असे आवाहन करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या