मुंबई : शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून चार दिवसांपासून सुरु असलेल्या विक्रीमुळं तब्बल गुंतवणूकदारांना 24.69 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. गुंतवणूकदारांसाठी सोमवार ब्लॅक मंडे ठरला. सोमवारी सेन्सेक्स 1048.90 अकांनी घसरला. यामुळं एकाच दिवसात 12.61 लाख कोटी रुपयांचं नुकसान गुंतवणूकदारांना सहन करावं लागलं. निफ्टी 345.55 अकांनी घसरुन 23085.95 अंकांवर बंद झाला. गेल्या चार सत्रांमध्ये सेन्सेक्स 2.39 टक्क्यांनी घसरला आहे. तर, रुपया निचांकी पातळीवर पोहोचला असून एका डॉलर 86.27 रुपये मोजावे लागतील.
सेन्सेक्स घसरण्याची कारणं काय?
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये विक्रीचं सत्र जोरदार सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय अमेरिकेत रोजगाराच्या मजबूत आकडेवारीमुळं व्याजदरातील कपातीची शक्यता कमी झाली आहे. यामुळं डॉलर मजबूत झाला असून त्याच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. जीडीपीच्या दरातील कमतरता आणि कमाई कमी झाल्यानं बाजारावर परिणाम झाला. याशिवाय तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणं न राहण्याचा अंदाज यामुळं शेअर बजारात घसरण सुरु आहे.
शेअर बाजारात सोमवारी सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीसह स्मॉल कॅप, मिडकॅप शेअर्समध्येही घसरण झाली. यामुळं छोट्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
डॉलर मजबूत होणं, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी त्यांचा पैसा भारतीय बाजारातून विक्री करुन काढून घेणं, डोनाल्ड ट्रम्प यांचं आर्थिक धोरण याचा प्रभाव बाजाराच्या घसरणीमागं असल्याचं सांगण्यात येत. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये आणखी घसरण होईल, असं सांगण्यात येत आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज नुसार येत्या काही महिन्यांमध्ये लार्ज कॅप शेअर चांगली कामगिरी करु शकतात. तर, मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये घसरण होऊ शकते. विदेशी गुंतवणूकदार संस्था भारतात गुंतवणूक करण्यास उत्सूक नसल्याचं चित्र आहे.
अमेरिकेत मजबूत रोजगार रिपोर्टनं फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दर लवकर कमी केले जातील याबाबतच्या आशा कमी झाल्या आहेत. त्यामुळं डॉलर मजबूत झाला, बाँण्ड यील्ड वाढले. त्यामुळं भारतासारख्या उभरत्या मार्केटमधील तेजी कमी झाली.
अमेरिकेतील सत्तांतराचा प्रभाव
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले तर कमला हॅरिस यांना पराभव स्वीकारावा लागला. येत्या 20 जानेवारीला जो बायडन यांच्या जागी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष होतील. जो बायडन यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी कच्च्या तेलावर सॅक्शन्स लावल्यानं त्याचा परिणाम झाला आहे. क्रुड आईलचे दर 82 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले आहेत. याचा दबाव देखील भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. त्यामुळ शेअर बाजारात घसरण झाली.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)