मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्यासमोरच अभाविप-युवासेनेत राडा
मुंबई विद्यापीठाच्या कल्याणमधील उपकेंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येणार, म्हणून अभाविपने आधीपासूनच निषेधाची भूमिका घेतली होती.

कल्याण : कल्याणमध्ये मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटनावेळी अभाविप-युवासेनेत मोठा राडा पाहायला मिळाला. युवासेना आणि अभाविप यांचा एकमेकांना असलेल्या विरोध नवीन नाही. मात्र आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्या समोरच आज गोंधळ घातला.
मुंबई विद्यापीठाच्या कल्याणमधील उपकेंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येणार, म्हणून अभाविपने आधीपासूनच निषेधाची भूमिका घेतली होती. विद्यापीठाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी चालतील, पण राजकीय पदाधिकारी नको, अशी अभाविपची भूमिका होती. सकाळी कार्यक्रमस्थळाबाहेर निदर्शनं झाली, पण तरीही कार्यक्रम सुरु झाला.
मात्र विरोधासाठी अभाविपनं थेट कुलगुरू सुहास पेडणेकर यांचं भाषण सुरु असतानाच निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि युवासेनेचे कार्यकर्ते थेट अभाविप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. पोलीस आम्हाला बाहेर काढत असताना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप अभाविप कार्यकर्त्यांनी केला आहे.
सगळा प्रकार घडला त्यावेळी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, श्रीकांत शिंदे असे शिवसेनेचे नेते मंचावर उपस्थित होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहावं, असं आवाहन यावेळी आदित्य ठाकरेंनी केलं. मात्र तरीही कार्यकर्ते काही शांत झाले नाहीत. अखेर या सगळ्यानंतर चांगल्या कामात तरी सर्व संघटनांनी एकत्र यावं, असं आवाहन आदित्य ठाकरेंना करावं लागलं.
या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अभाविप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र पोलिसांसमोर अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांवरही आता कारवाई होणार का? हे पाहावं लागेल.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News





















