Yogi Aditynath Mumbai tour: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM) हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबईतील बँकर्स, बडे उद्योगपती, अभिनेते आणि बड्या प्रोडक्शन हाऊसेस सोबत त्यांनी चर्चा केली. दरम्यान या दौऱ्यात 'योगी' असलेल्या 'आदित्यनाथ' यांच्या (Yogi Aditynath) 'योगीनॉमिक्स'ची अधिक चर्चा झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येणार हे कळताच टीकेची अधिक भर पडली. योगी मुंबईतून उद्योग पळवणार का? असे प्रश्न निर्माण झाले. योगी आलेत बँकर्स, उद्योगपती आणि प्रोडक्शन हाऊसेसला गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आणि निघून गेलेत. मात्र,अधिक चर्चा झाली ती त्यांच्या योगीनॉमिक्सचीच..
मुंबई दौऱ्यात योगींनी काय-काय केलं...
योगी आदित्यनाथ यांनी सर्वात आधी बड्या बँकर्सची भेट घेत गुंतवणुकीसाठी अर्थपुरवठा करण्याचं आवाहन केलं. यावेळी कोटक महिंद्राचे सीईओ उदय कोटक,एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा,एसआयडीबीआयचे शिवसुब्रह्मण्यम रमणसारख्या बड्या बँकर्सचा समावेश होता.
त्यानंतर बड्या उद्योगपतींशी देखील योगींनी चर्चा केली ज्यात आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक डॉ. निरंजन हिरानंदानी आणि जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी आणि अध्यक्ष सज्जन जिंदाल, पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी अदानी समूहाचे करण अदानी, अंबानी समूहाचे मुकेश अंबानी यांची देखील भेट घेतली.
मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न
त्यामुळे योगी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यात मोठे डेटा सेंटर उभारणीचे काम करणाऱ्या हिरानंदानींनी देखील योगींची पाठ थोपाटल्यानं अधिक चर्चा होते आहे.
उत्तर प्रदेशात होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटकरीता योगी आदित्यनाथ उद्योगपतींना निमंत्रण देण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. या समिटकरीता 17 लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशात आणण्याचा योगींचा विचार आहे. यातील 10 लाख कोटींचे उद्दिष्ट आत्ताच पूर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईत बँका आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीदरम्यान, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या विकासात भागीदार होण्याचे आणि नवीन भारताचे 'ग्रोथ इंजिन' बनण्याच्या प्रवासात तसेच 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.
हिंदुत्ववादी प्रतिमा असलेल्या योगींच्या अर्थनीतीची चर्चा
त्यामुळं हिंदुत्ववादी प्रतिमा असलेल्या योगींच्या अर्थनीतीची चर्चा होताना दिसतेय. उत्तर प्रदेश बदलत असल्याचं चित्र योगी आदित्यनाथ उभं करु पाहत आहेत. दुसरीकडे, मुंबईतील उद्योगपतींना आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रण देत आहेत. हिंदुत्ववादी आणि पारंपरिक प्रतिमा तोडत रोजगार आणि आर्थिक नीतीची जोड योगी आदित्यनाथ देऊ पाहत आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांना निवडणुकीत कसा फायदा होईल, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.