Mumbai Crime : सहकाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) निलंबित करण्यात आलं आहे. अभिजीत परब असं निलंबित पोलीस हवालदाराचं नाव आहे. ते मुंबई पोलिसांच्या स्थानिक आर्म युनिटमध्ये संलग्न आहेत. आरोपी पोलीस हवालदार आणि तक्रारदार हवालदार एकाच भागात राहतात. या प्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये (Worli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेमुळे वरळी पोलीस वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे.


काही दिवसांपूर्वी तक्रारदार हवालदार सदस्य असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक व्हिडीओ आला होता. हा व्हिडीओ आपल्या पत्नीचा असून अभिजीत परबने तो शूट केल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हा व्हिडीओ कोणी पसरवला हे स्पष्ट झालेलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं.


विभागीय चौकशी आणि आरोपी हवालदाराला निलंबित करण्याचा निर्णय 


पोलिसांच्या माहितीनुसार, "दरम्यान प्रथमदर्शनी अभिजीत परबचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं आढळून आल्यानंतर वरळी पोलिसांनी त्याला फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 41अ अन्वये पोलीस अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती, त्यानंतर त्याची विभागीय चौकशी करावी आणि चौकशी प्रलंबित असताना त्याला निलंबित करावे आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला."


अभिजीत परब यांचा गुन्हा गंभीर आणि महिलांविरोधातील असल्याने आणि त्यांचे वर्तन अनैतिक असल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. "आम्ही संबंधित महिलेच्या पतीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ कोणी पसरवला याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.


पत्नीला माहेरी पाठवलं आणि अभिजीत परबविरोधात तक्रार दाखल केली


दुसरीकडे बदनामीच्या भीतीने पत्नीने तक्रार करण्यास नकार दिला होता. परंतु पोलीस हवालदाराने त्याच्या सासरच्या मंडळींना घरी बोलावले. संबंधित प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि तिला घरी घेऊन जा असं सांगितलं. पत्नीला माहेरी पाठवल्यानंतर हवालदाराने वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरुन अभिजीत परब आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अज्ञात मोबाईल नंबर धारकाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 500 (बदनामी), 292 (अश्लील साहित्य प्रसारित करणे इ.), 293 (तरुणांना अश्लील कंटेट प्रसारित करणे), 34 (सामान्य हेतू) आणि 67 A (इलेक्ट्रॉनिक स्वरुपात लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट कृत्य असलेली सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.