Yashwant Jadhav IT Raid : सध्या दररोज महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आयकर विभागाच्या (Income Tax) आणि ईडीच्या (ED) धाडी सुरु आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांवर धाडी सुरु आहेत. अशातच, यशवंत जाधव यांच्या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. डायरीतील 'मातोश्री' म्हणजे आई, असं स्पष्टीकरण यशवंत जाधव यांनी दिलं असल्याची माहितीही आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 


शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये कोट्यवधीच्या व्यवहाराच्या नोंदी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यांत मातोश्रीला दोन कोटी दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती आयकरच्या सूत्रांनी दिली आहे. तसंच मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ दिल्याचाही डायरीत उल्लेख आहे. मात्र डायरीतील मातोश्री म्हणजे, आपल्या आई असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. आता आयकर विभागाकडून या संदर्भात तपास सुरु आहे. आयकर विभागानं जाधव यांच्या घरी छापेमारी करुन दस्ताऐवज जप्त केलं होतं. तसंच विमल अग्रवाल यांच्या घरीही आयकरनं छापेमारी केली होती. 


पाहा व्हिडीओ : Yashwant Jadhav यांच्याकडून 'मातोश्री'ला दोन कोटी? आयकर सूत्रांची माहिती



यशवंत जाधवांवर सोमय्यांनी केले होते आरोप
 
आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांवर आयकर विभागाकडून करण्यात आलेली कारवाई शिवसेनेसाठी धक्का समजली जात आहे. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते.


यशवंत जाधव प्रकरणी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना 'आयकर'ची नोटीस 


मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव प्रकरणी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी 10 मार्च 2022 रोजी आयकर विभागानं इकबालसिंह चहल यांना नोटीस पाठवली होती. त्याला चहल यांनी उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांना आयकरने नोटीस पाठवली आहे. 


केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना!


मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाकडून यशवंत जाधवांच्या घरी छापा टाकण्यात आला असून त्यांची काही संपत्तीही आयकर विभागानं जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :