Shivsena Yashawant Jadhav : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाधव यांच्या काही शेल कंपन्या उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


काही दिवसांपूर्वी,  आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. जवळपास चार दिवस आयकर विभागाने जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला होता. यावेळी त्यांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट अफेयर्सने यशवंत जाधव यांच्या 12 हून अधिक शेल कंपन्या उघडकीस आणल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचेही चौकशीत समोर आले होते. त्याशिवाय कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे. 


सोमय्यांचे आरोप 


जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोव्हिड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लाँड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. 


केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना!


मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha