मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव प्रकरणी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी 10 मार्च 2022 रोजी आयकर विभागाने इकबालसिंह चहल यांना नोटीस पाठवली होती. त्याला चहल यांनी उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांना आयकरने नोटीस पाठवली आहे. 


एप्रिल 2018 ते मार्च 2022 पर्यंत स्थायी समितीने जे-जे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, जे ठराव पास झाले त्याची सर्व कागदपत्रे घेऊन आयकर विभागाने या आधीच आयुक्ताना बोलावले होते. आता पुन्हा एकदा यासंबंधी त्यांना बोलावण्यात आलं आहे. या चार वर्षामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले त्या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय हा आयकर विभागाला आहे. त्यामुळेच या सर्व कॉन्ट्रॅक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सची यादी घेऊन, सर्व कागदपत्रे घेऊन मनपा आयुक्त इकबालसिंह चहल यांना पुन्हा एकदा आयकर विभागाने नोटीस धाडली आहे. 


इकबाल सिंह यांचे स्पष्टीकरण
आयकर विभागाची ही नोटीस म्हणजे नियमित प्रक्रियेचा भाग आहे. मी आतापर्यंत एकदाही आयकर विभागाच्या कार्यालयात गेलो नाही. या नोटीसला कार्यालयातील कनिष्ठ पातळीवरुन उत्तर दिलं जातं. 


काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी केली होती. यावेळी त्यांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट अफेयर्सने यशवंत जाधव यांच्या 12 हून अधिक शेल कंपन्या उघडकीस आणल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचेही चौकशीत समोर आले होते. त्याशिवाय कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -