मुंबई : काँग्रेस पक्षाला देशासह राज्यातील नेतृत्वावरुन सध्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत. वेगवेगळी नावं पुढं येत असताना आता काही नेत्यांनी पुन्हा बाळासाहेब थोरात यांच्याकडेच महाराष्ट्राचं नेतृत्व देण्यात यावं अशी मागणी केली आहे. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजेत, तर पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही असं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे त्यांनी आपलं हे मत अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिवांसमोर व्यक्त केलं आहे.


यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे सह प्रभारी आशिष दुवा आणि बी.एम.संदीप यांच्या समोर हे वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत 12-13 जागा येतील असं म्हटलं जात होतं. कुणी अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी धुरा सांभाळून यश खेचून आणलं. आपल्या 44 जागा आल्या. बाळासाहेब थोरात आपण प्रदेशाध्यक्ष राहिलेच पाहिजेत, पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असं त्या म्हणाल्या.


नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी देखील महिलांनी एकत्र येऊन बाळासाहेब थोरात यांची ताकद वाढवायला पाहिजे असं म्हटलं आहे.


प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले यांचं नाव सध्या आघाडीवर


 महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले यांचं नाव सध्या आघाडीवर आहे, पण बदलाबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधी मायदेशी परतल्यावरच होणार आहे. दोन दिवस मुंबईत मंत्री, आमदारांसोबत मंथन करुन दिल्लीत पोहोचलेले महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे दिल्लीत कुठल्याही महत्त्वाच्या बैठकीविनाच आज सकाळी कर्नाटकमध्ये परतले आहेत. दिल्लीत संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांच्यासोबत त्यांची बैठक अपेक्षित होती, ती बैठक न होताच एच के पाटील हे कर्नाटकला परतले. एच के पाटील यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याचंही सांगितलं जात होतं.


काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष जूनमध्येच मिळणार, पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया


प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. काल राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करताना नाना पटोले कसे राहतील अशी विचारणा प्रभारी एच के पाटील करत होते. त्यामुळे नाना पटोले यांच्या नावाला हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. काँग्रेस खासदार आणि सध्या गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांचंही नाव शर्यतीत आहे. त्यामुळे बिगरमराठा चेहरा देण्याबाबत काँग्रेसचा निर्णय अंतिम राहतो की ऐनवेळी आणखी कुठलं नाव समोर येतं याचीही उत्सुकता असेल.


दरम्यान दोन दिवस मुंबईत तातडीच्या बैठका खलबतं झाल्यानंतर दिल्लीत मात्र एच के पाटलांच्या बैठका थंडावल्या. काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपद, प्रदेशाध्यक्षपद, महसूलमंत्रीपद या तीनही पदांची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याने बदलाची ही प्रक्रिया सुरु झाली होती.





Congress President : काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर?