नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला त्यांचा पूर्णवेळ, नवा अध्यक्ष हा आता जून महिन्यातच मिळणार आहे. आज काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत या अंतर्गत निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यानंतर हे वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे. एप्रिल मे दरम्यान प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यानंतरच नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत समीक्षेसाठी आवाज उठवणारे गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, पी चिदंबरम हे या अंतर्गत निवडणुका तातडीनं व्हाव्यात या मताचे होते. मात्र त्याला अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदर, ए के अँन्टोनी या नेत्यांनी विरोध केला. त्यातही अशोक गहलोत यांनी अतिशय आक्रमकपणे हा मुद्दा खोडून काढला. आपण नेमका कुणाचा अजेंडा चालवतोय, भाजपमध्ये तरी अंतर्गत निवडणुका होतात का? आधी आपण कुणाशी लढलं पाहिजे याचा विचार करा..आधी पाच राज्यांच्या निवडणुका होऊ द्या, त्यानंतर आपण अध्यक्षीय निवडणुकीची चर्चा करु असं गहलोत म्हणाल्याचं बैठकीत उपस्थित सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर राहुल गांधींनीही आपल्या भाषणात लवकरच हा मुद्दा एकदाचा मिटवून टाकू असं म्हणत जूनमध्ये ही प्रक्रिया पार पडेल याचे संकेत दिले.


जुलै 2019 पासून म्हणजे जवळपास दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी काम करत आहेत. राहुल गांधी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर काही काळ ते पक्षातल्या घडामोडींपासून बाजूला होते. मात्र तरीही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत मात्र त्यांचं स्थान अजूनही अबाधित आहे. त्यामुळेच आता राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष म्हणून येणार की गांधी कुटुंबाहेरचा अध्यक्ष द्या या आपल्या जुन्या पवित्र्यावर राहुल ठाम राहतात हे लवकरच कळेल.


संबंधित बातम्या :