नवी दिल्ली: भारत बायोटेकच्या Covaxin या कोरोना लसीच्या पहिल्या फेजचा पुनरावलोकन डेटा 'द लॅन्सेट' या सायन्स नियतकालिकेत गुरुवारी प्रसिध्द करण्यात आला आहे. अशा प्रकारचा डेटा प्रकाशित करणारी भारत बायोटेक ही भारतातील पहिलीच कोरोना लस निर्मिती करणारी कंपनी आहे. ICMR नेही या गोष्टीला पुष्टी दिली आहे.
BBV152 (Covaxin) ही लस वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. तसेच या लसीमुळे लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ झाल्याचंही दिसून आलंय. गेल्या महिन्यात भारत बायोटेकने त्यांच्या फेज 1 आणि फेज 2 चा संशोधन डेटा लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेकडे जमा केला होता.
COVID-Vaccination | पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस टोचून घेणार!
भारत बायोटेकच्या पहिल्या फेजमध्ये 375 लोकांवर या लसीचा वापर करण्यात आला होता. त्यासंबंधीचा डेटा लॅन्सेटकडे जमा करण्यात आला होता. आता तो पहिल्या फेजचा डेटा लॅन्सेट या नियतकालिकेत प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की Covaxin लसीमुळे मानवी शरीरातील अॅन्टीबॉडी या क्रियाशील होतात, तसेच शरीरामधील T-cell याही क्रियाशील होतात. अॅन्टीबॉडी हे एक प्रकारचे प्रोटिन्स असतात जे मानवी शरीरातील व्हायरसविरोधात तयार होतात आणि त्या विरोधात लढतात. T-cell या कोणत्याही रोगाविरोधात लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीची निर्मिती करण्यासाठी अत्यावश्यक असतात.
Covaxin या लसीचे दोन डोस हे 14 दिवसांच्या अंतराने देण्यात आले. पहिला डोस ज्यावेळी दिला गेला तेव्हापासून 42 दिवसांनंतर त्याचे विश्लेषण करण्यात आले. लस दिलेल्यांपैकी एका व्यक्तीवर पाच दिवसांनी त्याची रिअॅक्शन आल्याचे दिसून आलं. पण नंतर असे लक्षात आले की ही रिअॅक्शन कोरोना लसी संबंधित नव्हती. Covaxin च्या दुसऱ्या डोस नंतर जवळपास 82-92% लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाल्याचं पहायला मिळालं.
... तर कोवॅक्सिन लस घेऊ नका; भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची आता तिसऱ्या फेजची क्लिनिकल ट्रायल सुरु असून त्यामध्ये 26 हजार लोकांवर या लसीचा वापर करण्यात येत आहे. Covaxin लस अद्याप क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याने लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्यास बीबीआयएलकडून भरपाई दिली जाईल, अशी घोषणा भारत बायोटेक कंपनीनं या आधीच केली आहे.
तसेच ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनी कोवॅक्सीन घेऊ नये असं भारत बायोटेकनं म्हटलं आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अॅलर्जी आहे, त्यांनी देखील कोवॅक्सीन घेऊ नये. याव्यतिरिक्त गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच, नवजात बालकांच्या मातांनीही लस घेऊ नये असं सांगण्यात आलं आहे.
COVAXIN : कोवॅक्सिनच्या लसीकरणानंतर साईड इफेक्ट झाला तर भारत बायोटेक देणार भरपाई