Stampede In Jagannath Rath Yatra: कुंभमेळा, तिरुपती आणि गोव्यात मंदिराच्या दारात झालेली चेंगराचेंगरीचा विसर पडत नाही तोपर्यंत आणखी एक घटना घडली आहे. आता ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक मोठा अपघात झाला. रविवारी पहाटे 4 वाजता गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान 3 भाविकांचा मृत्यू झाला. 30 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे बसंती साहू (36), प्रेम कांती महंती (78) आणि प्रभात दास अशी आहेत. मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत.
पुरेसे पोलिस किंवा सुरक्षा दल तैनात नव्हते
रथ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली असताना हा अपघात झाला. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि लोक पडल्याने चिरडले गेले. ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली त्या ठिकाणी पुरेसे पोलिस किंवा सुरक्षा दल तैनात नव्हते असे सांगितले जात आहे. भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ आधीच श्रद्धाबली (अंतिम बिंदू) येथे पोहोचले होते. नंतर, भगवान जगन्नाथाचा रथ गुंडीचा मंदिरात त्यांच्या मावशीच्या घरी पोहोचला.
शुक्रवारी शेकडो भाविकांची प्रकृती खालावली
शुक्रवारी (27 जून) रोजी, देवी सुभद्राच्या रथाभोवती गर्दी वाढल्याने 625 भाविकांची प्रकृती खालावली. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 70 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
शुक्रवारी रथयात्रा सुरू झाली
शुक्रवारी (27 जून) दुपारी 4 वाजता पुरीमध्ये भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरू झाली. प्रथम भगवान बलभद्रचा रथ ओढण्यात आला. त्यानंतर सुभद्रा आणि जगन्नाथाचे रथ ओढण्यात आले. पहिल्या दिवशी बलभद्रचा रथ 200 मीटरपर्यंत ओढण्यात आला, सुभद्रा-भगवान जगन्नाथाचे रथही काही अंतरापर्यंत ओढण्यात आले. शनिवारी सकाळी 10 वाजता पुन्हा रथयात्रा सुरू झाली. भाविकांनी तिन्ही रथ ओढण्यास सुरुवात केली. भगवान बलभद्र यांचा रथ तलध्वज सकाळी 11.20 वाजता गुंडीचा मंदिरात पोहोचला आणि देवी सुभद्रा यांचा दर्पदलन रथ दुपारी 12.20 वाजता पोहोचला आणि त्यानंतर भगवान जगन्नाथांचा नंदीघोष रथ दुपारी 1.11वाजता गुंडीचा मंदिरात पोहोचला.
गोव्यातील शिरगावमध्ये चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 50 जखमी
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोव्यातील शिरगावमध्ये शुक्रवारी रात्री श्री लैराई जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही माहिती मिळाली. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत, त्यापैकी 20 जण गंभीर जखमी झाले होते. मोठ्या संख्येने भाविक जत्रेत सहभागी होण्यासाठी मंदिराकडे जात होते. दरम्यान, एका दुकानासमोर विजेच्या तारेचा धक्का लागून काही लोक पडले. त्यानंतर गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली. गर्दी व्यवस्थापनासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने हा अपघात झाला. लैराई जत्रा हा उत्तर गोव्यातील बिचोलिम तालुक्यातील शिरगाव गावात आयोजित केलेला एक हिंदू धार्मिक उत्सव आहे. दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात ही जत्रा भरते. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक येथे येतात. ही जत्रा 2 मे रोजी संध्याकाळपासून 3 मे रोजी सकाळपर्यंत आयोजित करण्यात आली होती. याच काळात ही दुर्घटना घडली.
इतर महत्वाच्या बातम्या