Yakub Memon Latest News: मुंबई बॉम्बस्फोटातला (Mumbai Bomb Blast) दहशतवादी याकूबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) हात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीवर जे काही कोरोना काळात सौंदर्यीकरण झाले. उद्धव ठाकरेंनी माफी मागावी, अशी मागणी देखील भाजपनं केली आहे. याला काँग्रेसकडून जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबियांना देत नाहीत, भाजपने तो दिला असा आरोप काँग्रेसनं केला आहे. आमच्या काळात अफजल गुरू आणि कसाब यांचा मृतदेह अज्ञातस्थळी दफन केला होता. मात्र भाजपने 2015 साली मेमनची बॉडी दिली आणि त्यावर दफनविधी झाल्याचंही पाहायला मिळालं, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटलं आहे. लोंढे म्हणाले की, माझं काही लोकांसोबत बोलणं झालं. ज्यावेळी बॉडी दफन केली जाते त्याच्या तीन वर्षांनंतर दफन केलेल्या ठिकाणी वखर करण्यात येतं आणि ती कबर खोदली जाते. मात्र असं झालं नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे झालं आहे याचं उत्तर भाजपने द्यावं, असंही लोंढे म्हणाले. 


पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असे प्रकार समोर आणले जात आहेत


लोंढे म्हणाले की, पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असे प्रकार समोर आणले जात आहेत. काल आम्ही पाहिलं हिंदू हिंदू मुद्दा घेऊन भाजपत गेलेले मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला कुणाच्या मांडीला मांडी लावून बसले होते.  ज्यांच्यामुळे हिंदू खतरे में है म्हणणारे त्यांच्या बरोबर टेबलवर बसून हसत खेळत जेवणं करत होते. यांचं हिंदुत्व हिंदू लोकांनाच मारक आहे. सर्वात जास्त बेरोजगार हिंदू आहेत. सर्वात जास्त महागाईची झळ हिंदूंनाच सहन करावी लागत आहे. त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे, असं ते म्हणाले. 


'शांत महाराष्ट्राला नख लावण्याचं काम भाजप करत आहे'


लोंढे म्हणाले की, दहशतवाद्याचा मृतदेह देण्याचं पाप भाजपनं केलं आहे.  भाजपसोबत राहिलं की हिंदुत्ववादी आणि त्यांच्यासोबत राहिलं नाही की हिंदू विरोधी. शांत महाराष्ट्राला नख लावण्याचं काम भाजप करत आहे, असं लोंढे म्हणाले. दहशतवाद्यांना पाठिंबा देउन राजकारण करण्याचं काम भाजप करतं आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. अझहर मसूदला सोडायला तत्कालीन गृहमंत्री गेले होते हे संपूर्ण देशाने पाहिलं होतं. यूपीएच्या काळात दहशतवादी कारवाया आयएसआय करतं आहे, हे आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिलं होतं. आयएसआयला पठाणकोटमध्ये तपासासाठी भाजप सरकारने बोलवलं होतं. राम कदम आणि त्यांच्या पिलावळीने देशाची माफी मागितली पाहिजे, कारण यांच्यामुळे कारगील घडलं. अझर मसूदने बॉम्बस्फोट केले आणि हे केवळ पाहत राहिले होते. यांनी त्यावेळी मान झुकवली, असं देखील लोंढे म्हणाले. 


भाजपनं काय केला होता आरोप


चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना म्हटलं होतं की,  ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी. भाजप सरकारला विनंती करत आहे की सरकारने तातडीने सुशोभीकरण केलं, त्यांना शोधून काढावे.  हे गंभीर प्रकरण आहे.  उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही मग हे कसं केलं. याचा शोध लागला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे कॉम्प्रमाईज का केलं याचे उत्तर द्यायला हवे, असं बावनकुळे म्हणाले. तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी काय केलं? राज्याचे मुख्यमंत्री गप्प का बसले? त्यांना खुर्ची टिकवण्यासाठी हे करावे लागले का? असे सवालही बावनकुळे यांनी केला. ज्याने मुंबईला छिन्न विच्छिन्न केले त्याची कबर सुशोभित करणे, तिला सजवणे योग्य नाही. सरकार कारवाई करेल पण ही घटना उद्धव ठाकरे यांच्या काळात घडली. त्यामुळे यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी. राज्याच्या जनतेची माफी उद्धव ठाकरे यांनी मागावी. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अनेक घटनांचे समर्थन केले असे कबूल केलं पाहिजे, असंही बावनकुळे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Yakub Memon Grave Controversy Live Updates : याकूबची कबर कुणी सजवली? पाहा प्रत्येक अपडेट्स


याकूबच्या कबरीवरील एलईडी काढल्या; माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं, पोलिसांकडून बडा कब्रस्तानची पाहणी