Mumbai Updates: मुंबई बॉम्बस्फोटातला (Mumbai Bomb Blast) गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Meman) कबरीचं सुशोभिकरण केल्याचा प्रकार एबीपी माझानं समोर आणल्यानंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जागं झालं आहे. याकुबच्या कबरीवरील एलईडी लाईट्स पोलिसांनी काढून टाकल्या आहेत. माझाच्या बातमीनंतर पोलिसांच्या एका पथकानं काल रात्रीच मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये जाऊन वस्तुस्थिती तपासल्याची माहिती मिळतेय. तर महापालिकेचे अधिकारीही आज कब्रस्तानमध्ये (Kabrasthan) जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती आहे. मुंबईच्या गुन्हेगाराच्या कबरीवर सजावट करणाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.


शब ए बारातला संपुर्ण दफनभूमीला रोषणाई करण्यात येते. त्यामुळे याकुबच्या कबरीवरच्या रोषणाईचा फोटो जुना असू शकतो अशी शक्यता बडा कब्रस्तानचा कर्मचारी अशफाक अहमदनं दिली आहे. दरम्यान मुंबईला रक्तबंबाळ करणाऱ्या याकुबचं स्मारक बनतंय का? देशाच्या दुश्मनाचं उदात्तीकरण कशासाठी? ज्याला 1993 च्या स्फोटात दोषी ठरवण्यात आलं, त्याला हिरो बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न आता एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह रिपोर्टनंतर उपस्थित केले जात आहेत आणि याच विषयावर आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.


भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकमेकांवर आरोप
याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण झालं, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. तर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे की, सर्वात मोठी चूक भाजपची आहे. यूपीए सरकारच्या काळात दोन कुख्यात दहशतवाद्यांना फाशी देण्यात आली. एक अफजल गुरू आणि दुसरा कसाब. मात्र सरकारने दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले नाहीत. याचं कारण म्हणजे या लोकांच्या कबरी, ज्या ठिकाणी हे लोक दफन केले जातात, ती जागा कोणाला तरी रेलिंग पॉइंट बांधण्याची संधी देते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार झाले. इतके लोक का सामील झाले? भाजपने राजकीय फायद्यासाठी हे केले. याकुब मेमनच्या कबरीचा गौरव आज होत आहे. याला भाजप थेट जबाबदार आहे, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. 


एबीपी माझानं समोर आणलं होतं वास्तव
एबीपी माझानं याकुब मेमनच्या कबरीला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याबाबतचं वृत्त पहिल्यांदा दाखवलं होतं.   मेमनला फाशी दिल्यानंतर त्याच्या प्रेताचं दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. त्या ठिकाणच्या ओठ्याला एकंदरीत संगमरवरी बसवण्यात आल्या आहेत. त्यावर एलईडी दिवे लावले होते. हे दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात आणि मुख्यतः मेमनच्या कबरीवर प्रकाश टाकण्यासाठी लावण्यात आले होते. एका कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून या कबरीसाठी वीजपुरवठा केला जात होता. यावर आता प्रशासनानं अॅक्शन घेतली आहे. आता यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.