एक्स्प्लोर
RPF कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग, प्रकार कॅमेऱ्यात कैद
कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर 18 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र या सगळ्या प्रकाराबाबत कल्याण स्थानकातले आरपीएफचे अधिकारी कॅमेरासमोर काहीही बोलायला तयार नाहीत.
कल्याण : ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असते, त्या आरपीएफ जवानानेच महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडला आहे. हा प्रकार एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून अन्य प्रवाशांनी या जवानाला चोपही दिला. मात्र संतापाची बाब म्हणजे हा प्रकार घडला, तेव्हा हा जवान झोपेत असल्याची सारवासारव आरपीएफने केली. या जवानाला पाठीशी घालण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या केला जातो आहे. राजेश जहांगिड असे या विनयभंग करणाऱ्या सीआरपीएफचे नाव आहे.
रेल्वे आणि प्रवाशांची सुरक्षा करणं हे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफचं काम. मात्र याच आरपीएफच्या एका जवानानं प्रवासी महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार कल्याण स्थानकात घडलाय. राजेश जहांगिड असं या आरपीएफ जवानाचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा आहे. त्यानं केलेला हा सगळा प्रकार एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून यानंतर प्रवाशांनी त्याला चांगलाच चोपही दिला.
कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर 18 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र या सगळ्या प्रकाराबाबत कल्याण स्थानकातले आरपीएफचे अधिकारी कॅमेरासमोर काहीही बोलायला तयार नाहीत.
धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडल्यानंतरही जहांगिड यानं स्वतःहून त्याच्या वरिष्ठांना किंवा सहकाऱ्यांना याबाबत काहीही माहिती दिली नाही. प्रवाशांनी चित्रित केलेला हा व्हिडीओ बुधवारी व्हॉट्सऍपवर व्हायरल झाला आणि आरपीएफ अधिकाऱ्यांना हा प्रकार समजला. त्यानंतर राजेश जहांगिड याला तात्काळ निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या प्रकाराबाबत आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं स्पष्टीकरण धक्कादायक आणि संतापजनक आहे.
कल्याण आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने यांना याबाबत विचारलं असता त्यांनी कॅमेरासमोर बोलायला नकार दिला, मात्र ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी हा जवान ड्युटी संपवून तिथे हवा खायला गेला होता. कदाचित त्याला झोप लागली असेल आणि झोपेत असं झालं असेल, असं म्हणत त्यांनी अकलेचे तारेच तोडले. कारण आपण जर हा व्हिडीओ पहिला, तर हा जवान पूर्ण शुद्धीत आणि जागा असून तो मुद्दाम महिलेच्या पाठीला हात लावत असल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतं. त्यामुळं आरपीएफ अधिकारी त्यांच्या जवानाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
या प्रकारानंतर आरपीएफनं जहांगिड याला निलंबित केलं असलं, तरी ज्याप्रकारे त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, ते पाहता विभागीय चौकशीत तो निर्दोष असल्याचा अहवाल येईल, आणि तो लवकरच पुन्हा नवीन सावज शोधायला कामावर हजर होईल, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे आता खाकी वर्दीची विश्वासार्हता जपण्यासाठी तरी या जवानावर कडक कारवाई व्हावी, हीच अपेक्षा.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement