मुंबई : केसांच्या विगबाबत असमाधानी असलेल्या मुंबईच्या एका महिलेला अखेर 8 वर्षांनी न्याय मिळाला आहे. ग्राहक न्यायालयाच्या दणक्यामुळे विग बनवणाऱ्या क्लिनिकला महिलेस 37 हजारांची भरपाई द्यावी लागणार आहे.


 
2008 मध्ये कांदिवलीत राहणाऱ्या एका महिलेने 18 हजार रुपयांना केसांचा विग खरेदी केला होता. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर विगसाठी 17 हजार, मानसिक त्रासासाठी 10 हजार आणि कायदेशीर लढाईचे 10 हजार अशी 37 हजार रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे.

 
13 मे 2008 रोजी तक्रारदार महिलेने खारच्या एका क्लिनीकमधून स्वतःसाठी विग बनवून घेतला. तिने स्वतः डिझाईनची निवड केली होती आणि त्यानुसार मोजमाप घेण्यात आलं होतं. त्याचे 18 हजार रुपयेही तिने भरले, मात्र प्रत्यक्ष विग घेताना तो आपल्या पसंतीनुसार बनवला नसल्याचं तिच्या लक्षात आलं.

 
संबंधित विग केसात नीट बसत नसल्यामुळे तिने तो घेण्यासही नकार दिला. मात्र क्लिनीकमधील एका कर्मचाऱ्याने त्यांना तात्पुरता तो विग वापरण्याचा सल्ला दिला. तरीही पसंत न पडल्यास बदलून देण्याची हमीही त्याने दिली. महिलेने त्यानुसार विग वापरण्यास सुरुवात केली, मात्र तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला.

 

 

तीन महिन्यांनी तिने पुन्हा क्लिनीकमध्ये धाव घेतली. मात्र क्लिनीकमधील कर्मचाऱ्यांना विग बदलण्यासाठी 5 हजार रुपये अधिक भरावे लागतील, असं तिला सांगितलं. यावरही महिलेने होकार दर्शवत एक हजार रुपयांचा अॅडव्हान्स भरला.

 
नवीन विग घेण्यासाठी गेलं असताना महिलेची पुन्हा निराशा झाली. नव्या विगऐवजी जुन्यातच काही फेरफार करुन तिला सोपवण्यात आला होता. चिडलेल्या महिलेने पैसे परत करण्यास सांगितल्यावर क्लिनीकने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर महिलेने कोर्टाचं दार ठोठावलं, मात्र क्लिनीकच्या कर्मचाऱ्यांनी महिला खोटं बोलत असल्याचा दावा करण्यात आला.

 
अखेर कोर्टाने महिलेच्या बाजूने निकाल दिला. विगसाठी 17 हजार, मानसिक त्रासासाठी 10 हजार आणि कायदेशीर लढाईचे 10 हजार अशी 37 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने क्लिनीकला दिले आहेत.