विरार : लिंग परिवर्तन करुन एकत्र राहणाऱ्या दाम्पत्याचा नालासोपाऱ्यात छळ सुरु आहे. त्यामुळे आर्या दाम्पत्याचं जगणं मुश्कील झालं आहे. यातल्या एकानं तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या टोळक्याचा बंदोबस्त कसा करणार असा प्रश्न आहे.
लिंग परिवर्तन करुन जेम्स सेमसन फ्रान्सीस, कालिका आर्या झाली. आपला मित्र रामश्री आर्यासोबत संसार थाटला. दोघांनी एकमेकांना आनंदानं स्वीकारलं. पण समाजातील विकृत मानसिकतेच्या लोकांनी मात्र या दाम्पत्याला त्रास द्यायाला सुरुवात केली.
आर्या दाम्पत्य नालासोपाऱ्यात राहतं. पण घरातून बाहेर पडलं की चौकातलं टोळकं त्यांच्यावर शेरेबाजी करतं. त्याला वैतागून कालिकानं दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पूर्वाश्रमीचा जेम्स गोरेगावातील एका कॉल सेंटर ट्रेनर म्हणून काम करत होता. तिथं त्याची पूर्वाश्रमीच्या रिझवान खानची ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आपलं प्रेम पूर्ण करण्यासाठी जेम्सनं लिंग परिवर्तन करुन स्त्रीत्व स्वीकारलं.
जेम्स आणि रिझवानच्या या निर्णयाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी कुटुंबापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर धार्मिक अडसर दूर करण्यासाठी जेम्सनं ख्रिश्चन आणि रिझवाननं मुस्लिम धर्माचा त्याग केला आणि हिंदू धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर नामांतर झालं. जेम्स कालिका तर रिझवान रामश्री झाले. पण समाजातून होणार छळ काही थांबला नाही.
नैसर्गिक कारणामुळे लिंग परिवर्तन करुन जेम्सनं आर्या बनण्याचा निर्णय घेतला. आर्यानं घेतलेल्या या निर्णयाचं समाजानं स्वागत करणं अपेक्षित आहे. पण लैंगिक कारणावरुन शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यांना कधी परिपक्वता येणार हा प्रश्नच आहे.