Mumbai Crime Updates:  प्रेमात अडसर ठरणाऱ्या आपल्या 46 वर्षीय पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने स्लो पॉयजन म्हणजेच रोज जेवणातून थोडं थोडं विष देऊन काटा काढला. या प्रकरणी क्राईम ब्रांचं युनिट 9 ने मोठ्या शिताफीने चौकशी करून मयत यांची पत्नी काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांना गुरुवारी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत कमलकांत शहा (कापड व्यापारी) आणि त्यांची पत्नी काजल यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. काजल हिच्या प्रेमप्रकरणाची कमलाकांत यांना कुणकुण लागली होती. यावरून त्यांच्यात वारंवार भांडण देखील व्हायचे. यामुळे काजल आपल्या पतीला सोडून विभक्त राहू लागली. मात्र तिला पुन्हा नातेवाईक यांनी समजावून आणले. यानंतर काजल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने जेवणातून विष देऊन कमलकांत यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गोष्ट कमलाकांत किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या ध्यानात आली नाही. 


ऑगस्ट महिन्यात कमलाकांत यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिथंही प्रकृती न सुधारल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या रक्तातील घटक तपासले असता यात आर्सेनिक आणि थॅलियमचे प्रमाण जास्त आढळून आले. उपचारादरम्यान कमलाकांत यांचा मृत्यू झाला. मात्र कुटुंबियांचा संशय बळावल्याने सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली.






सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रँच युनिट 9 कडे वर्ग करण्यात आल्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर संशय बळावला. यानंतर तांत्रिक बाबी इतर माहितीच्या आधारे तपास करून गुन्ह्याची उकल करण्यात आली. यानंतर मयत यांची पत्नी काजल शाह आणि तिचा प्रियकर हितेश जैन (45) यांना गुरुवारी अटक करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना 8 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


पोलिसांनी सांगितलं की, मृतकमलकांत शहा यांच्या रक्तात आर्सेनिक आणि थॅलियमचे प्रमाण जास्त होते. मृत्यूपूर्वी कमलकांत शहा यांच्या रक्तात आर्सेनिक आणि थॅलियम सामान्य पातळीपेक्षा शेकडो पट जास्त आढळून आले. त्याची पत्नी, काजल हिच्यावर फ्लेवर्ड दुधात त्यांना ते दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.