Panvel Crime Updates: पनवेल येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आपल्या जाळ्यात ओढत एका महिलेने लाखोंची वसुली केली आहे. सोशल मिडीयावरून फोन करत आपले अश्लील व्हिडिओ पाठवून पहिले जाळ्यात ओढले. यानतंर संबंधित वृध्दाचे व्हिडीओ कॉलचे स्क्रिन शॅाट काढून घेत व्हायरल करण्याची धमकी देत 2 लाख 15 हजाराची वसुली या महिलेने केली आहे. महिलेबरोबर तिचे इतर साथीदार यात सामील असून यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणातील 70 वर्षीय तक्रारदार ज्येष्ठ नागरिक पत्नीसह पनवेलमध्ये राहण्यास असून त्यांची दोन्ही मुले परदेशामध्ये राहण्यास आहेत. गत जून महिन्यात सदर ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह लंडन येथे राहणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्या कालावधीत या ज्येष्ठ नागरिकाच्या व्हॉट्सअपवर निशा शर्मा नावाच्या महिलेने अश्लील आणि नग्न फोटो पाठवले होते. त्यानंतर सदर महिलेने त्याच दिवशी ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क साधून स्व:ताचे अश्लील आणि नग्न फोटो दाखवून त्यांना सुद्धा तसे करण्यास भाग पाडले होते.


त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ नागरिक भारतामध्ये आल्यानंतर निशा अग्रवाल नावाच्या महिलेने त्यांच्या व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल करून स्व:ताचे नग्न फोटो दाखवून त्यांना त्याप्रमाणे करण्यास सांगितले होते. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने भावनेच्या आहारी जाऊन सदर महिलेने सांगितल्यानुसार कृत्य केले होते. 


मात्र सदर महिलेने या ज्येष्ठ नागरिकाचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सदरचा व्हिडीओ ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअपवर पाठवून दिला. त्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. अन्यथा सदरचे व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड करून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने घाबरून सदरचे व्हिडीओ डिलीट केले.


मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सदर टोळीतील सायबर चोरट्याने अहमदनगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून या ज्येष्ठ नागरिकाला संपर्क साधून त्यांचे अश्लिल व्हिडीओ यु ट्युबवर अपलोड झाल्याचे सांगितले. तसेच यू टयूबचे राहुल शर्मा यांचे पत्र त्यांच्याकडे आल्याचे सांगून त्यांचे व्हिडीओ त्वरीत डिलीट करण्यासाठी यु ट्यूबच्या राहुल शर्मा याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची भीती दाखवली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने घाबरून राहुल शर्मा याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने सदरचे अश्लिल व्हिडीओ डिलीट करण्यासाठी  21,999 भरण्यास सांगितले.


त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांने पैसे पाठविल्यानंतर दुसरा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पुन्हा 42,999  पाठविण्यास सांगितले. ती रक्कम सुद्धा ज्येष्ठ नागरिकाने पाठवली. अशा प्रकारे सदर टोळीने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्यांच्याकडून एकूण 2 लाख 15 हजार रुपये उकळले. मात्र त्यानंतर देखील सदर टोळीने वेगवेगळी करणे सांगून आणखी रक्कम मागण्यास सुरुवात केल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सदर प्रकारची माहिती आपल्या पत्नीला देऊन सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.