Mumbai Double Decker Electric Bus: डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस मुंबईच्या रस्त्यावर 14 जानेवारी 2023 पासून धावणार आहेत. इलेक्ट्रिक बसेस जानेवारी महिन्यामध्ये सुरु होणार आहेत. त्यानंतर 104 जानेवारी रोजी 10 डबल डेकर बसेस मुंबईच्या रस्त्यावरुन धावणार आहेत. बेस्टचे (Brihanmumbai Electricity Supply and Transport) महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत 900 ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत, त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा लाभ मिळणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये अशा नवीन बसेस समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. 


प्रवासी क्षमता वाढविण्यासोबतच डिझेलवरील खर्च कमी करण्यासाठी बेस्टने 900 ईलेक्ट्रिक बस आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय. त्यापैकी पहिल्या 50 बस जानेवारी महिन्यापासून मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहेत. दरम्यान, 2028 पर्यंत शहरात चालणाऱ्या सर्व डिझेल बसेस इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याची सरकारची योजना आहे. राज्य सरकारचे म्हणणे आहे की, बेस्टच्या सर्व बस एकतर पूर्णपणे इलेक्ट्रिकवर धावतील किंवा त्या हायड्रोजन इंधन सेलवर चालवल्या जातील. कोणत्या माध्यमाने बसेस चालवणे अधिक सुरक्षित आणि कमी खर्चिक असेल हे यावर अवलंबून असेल. दरम्यान,  एका अहवालानुसार, मुंबईतील डबल डेकर बसची संख्या 2019 मध्ये 120 वरून 2021 मध्ये केवळ 48 वर आली आहे. हे पाहता शहरातील सर्वात जुने वाहतूक माध्यम सुरक्षित ठेवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.


मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार बेस्टमध्ये नवीन बसेस समाविष्ट करत आहे. शहरात दररोज 30 लाखांपेक्षा जास्त प्रवासी बसने प्रवास करतात. येत्या एक ते दोन वर्षांत प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  सरकारने 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसना मान्यता दिली आहे. त्यामधील काही बसे 2023 च्या सुरुवातीला धावणार आहेत. 


बेस्टही टॅक्सीची सेवा देणार -
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे... ओला, उबरच्या धर्तीवर आता बेस्टही टॅक्सीची सेवा देणार आहे. मोबाईल अॅप आधारित टॅक्सीची सेवा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कंबर कसलीय. येत्या सहा महिन्यांत बेस्टच्या ताफ्यात पाचशे टॅक्सी दाखल होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, ओला, उबर तसेच अन्य टॅक्सी सेवांच्या तुलनेत बेस्टची टॅक्सी स्वस्त असणार आहे. टॅक्सीच्या सेवेसोबतच पुढच्या आठवड्यात बेस्टची प्रिमियम बस सेवाही सुरू होणार आहे. ही प्रिमियम बस बीकेसी ते ठाणे आणि खारघर ते बीकेसी अशा मार्गांवर चालणार आहे.


ई चार्जिंग सेवा


मुंबईकरांना विजेवर धावणाऱ्या वाहनांचे चार्जिंग करता यावे यासाठी मुंबईत 330 ई-चार्जिग केंद्रे उभारण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. शहरातील बस आगार, बस स्थानके आणि खासगी गाड्या उभ्या करण्यासाठी जागा असलेल्या बस थांब्यावर चार्जिग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. येत्या २ – ३ महिन्यांत ३३० चार्जिग केंद्रे मुंबईकरांसाठी खुली होतील.