मुंबई : मुंबईमध्ये रेल्वे स्थानकांवर नुकत्याच काही वर्षांपासून वन रुपी क्लिनिक्स सुरु करण्यात आली आहेत, याचा आता रुग्णांना चांगलाच फायदा होत असल्याचं दिसून येत आहे. एका महिलेने गुरुवारी सकाळी पनवेल रेल्वे स्थानकावर बाळाला जन्म दिला. नेरुळ ते पनवेल असा प्रवास ही गर्भवती महिला करत होती. या दरम्यान पनवेल रेल्वे स्थानकावरच महिलेला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. अगदी पहाटे या गर्भवती महिलेला प्रसववेदना होत असल्याने तात्काळ मदत म्हणून वन रुपी क्लिनिक फायदेशीर ठरलं. या क्लिनिकमधील डॉक्टर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे स्थानकावरच बाळाला जन्म देण्यात आला.


रेल्वेनं प्रवास करणारी ही गर्भवती महिला नवी मुंबईतील नेरुळहून पनवेलकडे जात होती. आई आणि बाळ निरोगी असून त्यांना पुढील उपचारांसाठी जवळपासच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अशा प्रकारे वन रुपी क्लिनिक प्रवाशांच्या किती मदतीचं ठरतं हे दिसून येतंय. यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत जेव्हा रुग्णांना तात्काळ मदत म्हणून वन रुपी क्लिनिकची फार मदत झाली.



रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीदेखील या घटनेची नोंद घेतली. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचं कौतुक करत त्यांनी ट्वीट केलं, याआधीही वन रुपी क्लिनिकची अशा प्रकारे अनेकांना मदत झालेली असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. 


नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ सापडलं,अवघ्या पाच तासात छडा | एबीपी माझा