मुंबई : म्हाडाच्या (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण) कोकण मंडळातर्फे सहा हजार 651 घरांची लॉटरी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निघणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार घरे बांधली जाणार आहेत. तर खासगी विकसकांकडून म्हाडाला 20 टक्के मिळणार आहे.


पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे ही मोहिम राज्यात सर्वत्र राबविली जात आहे. 2020 पर्यंत जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा करून द्यायचा असल्याने, गृहनिर्माण क्षेत्रात काम करत असलेल्या म्हाडा प्रशासन जोमाने काम करत आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कल्याण शिरढोण परिसरात अडीच हजार तर खोणी परिसरात अडीच हजार घरे बांधली जाणार आहेत. या घरांचा प्लॅन मंजूर झाला असून, 2021 पर्यंत ही घरे बांधून पूर्ण करण्याचा म्हाडा कोकण मंडळाचा मानस असल्याचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या 5 हजार घरांच्या योजना मंजुरीची प्रक्रियेचे म्हाडा कोकण मंडळाकडून अंतिम टप्पात काम सुरू असून, हे काम येत्या 15 ते 20 दिवसांत पूर्ण होईल, त्यानंतर या घरांचा लॉटरी प्रक्रियेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरीपर्यंत म्हाडा कोकण मंडळाची ही सर्वात मोठी लॉटरी प्रसिद्ध होणार असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.

तर खासगी विकसकांकडून म्हाडाला घणसोली येथे 40, वालिव-वसई-पालघर येथे 15, मोघरपाडा ठाणे येथे 2, पारसिक ठाणे येथे 16, भिवंडीत 161 तर मनकोली येथे 118 अशी एकूण 279 तर ठाण्यातील डावले गावात 28 घरे म्हाडाला मिळाली आहे. खासगी विकसकांकडून म्हाडाला प्राप्त मिळालेल्या घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून, या इमारती पूर्ण झाल्या आहेत.