Hat Man Killer in Mumbai : सध्या मुंबईतील (Mumbai News) एका धक्कादायक घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. रस्त्याच्या मधोमध एका महिलेवर चाकूनं सपासप वार करुन तिचा खून करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबला नाही, तर या घटनेनंतर हल्लेखोराने महिलेचा मृतदेह ओढत फुटपाथवर नेला. सीसीटीव्हीमध्ये त्यावेळी आजूबाजूनं वाहनं जाताना दिसत आहेत. ही घटना मुंबईतील अंधेरी परिसरातील (Andheri News) असल्याचं बोललं जात आहे.
सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होणाऱ्या हॅटमॅनच्या व्हिडीओची (Hat Man Killer) मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) दखल घेत एक खुलासा करण्यात आला आहे. मुंबईत कोणत्याही महिलेची हॅटमॅनकडून हत्या झाली नसल्याचं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
व्हिडीओमध्ये काय दिसतंय?
मुंबईत घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गाडीतून उतरते. त्यानंतर कार महिलेला तिथे सोडून निघून जाते. त्यानंतर तिथे हल्लेखोर येतो आणि महिलेवर चाकूनं सपासप वार करतो. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळते. हल्लेखोर तिचे पाय धरुन तिला ओढत रस्त्याच्या पलिकडच्या फुटपाथवर नेतो.
व्हिडीओमध्ये हल्लेखोरानं काळा कोट-पँट आणि टोपी घातलेली आहे. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी घडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ :
ट्विटरवर हॅटमॅनचा ट्रेंड
दरम्यान, हल्लेखोरानं महिलेची हत्या का केली? हे स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर ट्विटरवर #HatmanKillerInMumbai हॅशटॅग ट्रेंड करत आहे. लोकांना हॅटमॅनपासून सावध राहण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच, अनेक युजर्स हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
व्हायरल दहशत, विश्वास ठेवू नका; मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
आता या व्हिडीओसंदर्भात मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. झपाट्यानं व्हायरल होणारा व्हिडीओ आणि नागरिकांमध्ये पसरणारं भितीचं वातावरण पाहता पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओसंदर्भात खुलासा केला आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अशा कोणत्याही घटनेची माहिती मिळाली नाही. तसेच, मुंबईत कोणत्याही महिलेची हॅटमॅनकडून हत्या झालेली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.