Aarey Leopard Attack : मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व भागात असलेल्या आरे कॉलनी (Aarey Colony) परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचे हल्ले (Leopard Attack) वाढले आहेत. आरे कॉलनी आदर्श नगर परिसरात बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. संगीता गुरव असं महिलेचं नाव आहे. काल (11 नोव्हेंबर) संध्याकाळी त्या घरी असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये संगीता गुरव यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. सध्या गुरव यांच्यावर जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.,


दिवाळीच्या पहाटे बिबट्याने चिमुकली बळी घेतला
याआधी दिवाळीच्या दिवशी (24 ऑक्टोबर) आरे कॉलनी 15 नंबर युनिटमध्ये बिबट्याने एक दीड वर्षाची मुलीवर हल्ला केला होता, त्यामध्ये चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दीड वर्षाची मुलगी आईसह दिवाळीचे दिवे लावण्यासाठी घराबाहेर आली होती. दिवे लावल्यानंतर घरामध्ये जात असताना मागून बिबट्याने दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी आई घरात होती. इतिका बराच वेळ झाला तरी घरात न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात आढळला.


पिंजरे लावून दोन बिबट्यांना पकडलं 
या घटनेनंतर बोरिवली वन विभागाची टीम ॲक्शन मोडमध्ये आली आणि पिंजरा लावून ट्रॅप दोन बिबट्यांना केलं होतं. वनविभागातील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी प्रमुख ठिकाणी पिंजरे लावले असून परिसरात लावलेल्या 30 कॅमेऱ्यांद्वारे बिबट्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. परंतु असं असूनही बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


सध्या आरे कॉलनमध्ये आठ ते दहा बिबट्यांचा वावर
दरम्यान सध्या आरे कॉलनी परिसरामध्ये आठ ते दहा बिबट्यांचा वावर आहे. आरे कॉलनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडे आणि वस्ती आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.


आरे हा बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास
आरे हे मुंबईतील हरितक्षेत्र आहे, जे पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये आहे. इथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ आहे. हे बिबट्यांचं घर समजलं जातं. त्यामुळेच आरे कॉलनीमध्ये बिबट्या दिसणं आणि हल्ले होण्याच्या घटना वारंवार समोर येतात. आरे हा बिबट्यांना नैसर्गिक अधिवास आहे. परंतु इथे बांधकाम आणि अतिक्रमण वाढल्याने वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी आहे. त्यामुळे मनुष्य आणि जनावरामध्ये संघर्षाच्या घटना घडत आहे, असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे.


संबंधित बातमी


Aarey Colony : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; आरे कॉलनीतील घटना