Ketaki Chitale : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतळी चितळेला अटक करण्यात आली. तिच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) लावल्यावरुन आता पोलीस अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात कळवा पोलीस स्टेशनमधील जबाबदार अधिकाऱ्याने केतकी चितळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) का लावलं याचं उत्तर आणि अहवाल मागितला आहे.


सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्दबातल ठरवलेल्या कलमाचा गैरवापर झाल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत अहवाल मागवला आहे.


अभिनेत्री केतकी चितळे अटक प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना समन्स पाठवून उत्तर देण्यास सांगितलं होतं. समन्सनंतर महासंचालकांनी राष्ट्रीय महिला आयोगाला कारवाईचा अहवाल पाठवला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी दिल्लीत काल (17 जून) सुनावणी झाली. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या वतीने विशेष महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे हे आयोगासमोर हजर झाले. यावेळी रेखा शर्मा यांनी अहवालावर आक्षेप घेतला होता. त्यांना या अहवालातील त्रुटी काढल्या. "या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेलं कलम 66 A का लावण्यात आलं? प्राथमिक तपासापूर्वीच केतकी चितळेला अटक का करण्यात आली?" याचं स्पष्टीकरण देण्याचे निर्देश आयोगाने मिलिंद भारंबे यांना दिले आहेत. त्यानंतर आता त्यांनी ठाण्यातील कळवा पोलिसातील जबाबदार आधिकाऱ्यांना या प्रकरणातील त्रुटींबाबत जाब विचारला आहे.


आयोगाने असंही निरीक्षण नोंदवलं की अदखलपात्र प्रकरणांमध्ये पोलीस वॉरंटशिवाय अटक करु शकत नाहीत. परंतु या प्रकरणात कोणतंही वॉरंट जारी केलेलं नाही. पोलिसांनी राजकीय सूडबुद्धीच्या आधारावर कारवाई करु नये तर प्रत्येक प्रकरणात निष्पक्षपणे कारवाई करावी, असंही आयोगाने सांगितलं.


केतकी चितळेने 15 मे रोजी फेसबुकरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. कथित फेसबुक पोस्ट संदर्भात तिच्याविरुद्ध एकूण 22 एफआयआर आणि दोन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.