मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचे विविध मुहूर्त निघून रद्द होत आहेत. आता अखेरीस मंत्रिमंडळ विस्तारासाठी 30 डिसेंबरची तारीख ठरली आहे. या विस्तारासाठी होत असलेल्या विलंबाला तिन्ही पक्ष एकमेकांना जबाबदार ठरवत आहेत. हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात बैठक घेतली. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा होती. त्यानुसार 24 डिसेंबरचा मुहूर्त विस्तारासाठी ठरवल्याचंही बोललं जात होतं. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते दिल्लीत हायकमांडच्या भेटीलाही गेले. मात्र काँग्रेसची यादीच 23 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत ठरली नाही. काँग्रेसकडून कुणाला संधी द्यायची याबाबत निर्णय न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार टळल्याची चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मात्र कुणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत चर्चा सुरु आहे. दिल्ली हायकमांडने पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर फुली मारुन, अशोक चव्हाणांच्या डोक्यावर हात ठेवल्याचं कळतंय. तर विदर्भात यशोमती ठाकूर ,अमित झनक की सुनील केदार तर पश्चिम महाराष्ट्रात सतेज पाटील की विश्वजित कदम असा पेच काँग्रेससमोर आहेत. मुंबईतही अमिन पटेल की अस्लम शेख आणि विजय वडेट्टीवार की अमित देशमुख यांचा समावेश मंत्रिमंडळात करायचा याचा निर्णय झाला नसल्याने काँग्रेसच्या यादीला उशीर होत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीला गृह किंवा नगरविकास खात हवं आहे. ही दोन्ही खाती सध्या शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे या खात्यांबाबत अजून निर्णय झाला नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे, अशी देखील चर्चा आहे. मात्र असे काहीही मतभेद नाही, योग्य वेळी तारीख ठरेल. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील, असं जयंत पाटलांनी सांगितलं.
अमावस्या आणि ग्रहण मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?
मंत्रिमंडळ विस्तराला होत असलेल्या उशीरासाठी आणखी एक कारण समोर येत आहे. अमावस्या आणि ग्रहण असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे. राजकीय पक्ष याबाबत खुपच खबरदारी घेत असल्याने 25 आणि 26 तारखेला विस्तार नको अशी भूमिका होती. त्यात काँग्रेसचा 28 डिसेंबर रोजी मुंबईत स्थापना दिनानिमित्त मोठा कार्यक्रम आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाला नागपूरला गेलेले सरकारी कर्मचारी अजून परतत आहेत. या काही व्यावहारिक अडचणींमुळे महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या
- राष्ट्रवादीत तरुण आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस, कुणाला संधी मिळणार?
- ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त
- समर्थक आमदारांना मंत्रीपदं मिळावीत यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी; 'ही' नावे चर्चेत
- सध्याचं मंत्रिमंडळ काही काळापुरतं, डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार
- महाविकास आघाडीचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर!