मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नवीन वर्षाआधी होणार आहे, असं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सर्वच मोठ्या नेत्यांनी मंत्रिपदासाठी हालाचली सुरु केल्या आहेत. यामध्ये नव्याने निवडून आलेले आमदारही मागे नाहीत. राष्ट्रवादीच्या नवीन आमदारांमध्येही मंत्रिपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. यापैकी कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेतील.
पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांमध्ये मंत्रिपदाच्या शर्यतीत शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं नाव आघाडीवर आहे. त्यानंतर विद्यमान खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांचं नाव समोर येत आहे. मंत्री जयंत पाटील यांचे पुतणे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.
शरद पवार यांचे निकटवर्तीय दिवंगत गोविंदराव निकम यांचे पुत्र चिपळूनचे आमदार शेखर निकम हे देखील मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. अजित पवार यांचे विश्वासू मावळचे आमदार सुनील शेळके यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे हरवून आमदारकीची निवडणूक जिंकली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा विस्तार सोमवार 30 डिसेंबरला दुपारी 1 वाजता होणार आहे, असं वृत्त शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनात छापून आलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्तार आज होणार अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसकडून मंत्रिमंडळात पाठवण्यात येणाऱ्या नेत्यांची अंतिम यादी तयार नसल्यानं मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रिमंडळासाठी राष्ट्रवादीची संभाव्य यादी
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
नवाब मलिक
राजेश टोपे
अनिल देशमुख
जितेंद्र आव्हाड
संबंधित बातम्या
- ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त
- समर्थक आमदारांना मंत्रीपदं मिळावीत यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी; 'ही' नावे चर्चेत
- सध्याचं मंत्रिमंडळ काही काळापुरतं, डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार
- महाविकास आघाडीचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर!
VIDEO | ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त