मुंबई : भाजपच्या झारखंडमधील पराभवानंतर शिवसेनेनं भाजपवर 'सामना'तून निशाणा साधला आहे. झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा भाजप करता होता. मात्र प्रत्यक्षात अनेक राज्येच भाजपमुक्त झाली आहेत, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला आहे. काँग्रेसला 16 आणि आरजेडीला एका जागेवर यश मिळालं आहे. तर सत्तेत असलेल्या भाजपला 27 जागांवर रोखण्यात जेएमएम, काँग्रेसला यश मिळालं.


"नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल. लोकांनी ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात. महाराष्ट्रात ते झालेच. झारखंडही बेडरपणे बदलाला सामोरे गेले. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार", असा टोला शिवसेनेनं लगावला.


काँग्रेसमुक्त ऐवजी अनेक राज्ये भाजपमुक्त झाली


"महाराष्ट्र व झारखंड या राज्यांची तुलना करता येणार नाही. मात्र भाजपने आणखी एक राज्य गमावले व पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ राबवूनही झारखंड भाजपला राखता आले नाही. काँग्रेस-राजदच्या पाठिंब्यावर झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार तेथे येत आहे. हे भाजपसाठी धक्कादायक आहे. काँग्रेसमुक्त भारतची घोषणा भाजपचे नेते करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली. मध्य प्रदेश, राजस्थान ही मोठी राज्ये भाजपने आधीच गमावली", याची आठवण शिवसेनेनं करुन दिली.


"भाजप 2018 साली साधारण 75 टक्के प्रदेशांत सत्ता ठेवून होती. आता घसरगुंडी झाली आहे व जेमतेम 30-35 टक्के प्रदेशांत भाजपची सत्ता दिसत आहे. भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे. 2018 ला देशातील 22 राज्यांत भाजपची सत्ता होती. ईशान्येकडील राज्यांतही भाजप घुसली. अगदी त्रिपुरा, मिझोरामपर्यंत त्यांचे झेंडे फडकले, पण आज त्रिपुरात निवडणुका घेतल्या तर तेथील जनता भाजपची सत्ता उलथवून लावील अशी स्थिती आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भात सगळय़ात जास्त त्रिपुरात हिंसाचार झाला व तो रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरलं", असं टीकास्त्र शिवसेनेनं सोडलं.


संबंधित बातम्या

VIDEO | Jharkhand Election Results 2019 | झारखंडनेही भाजपला नाकारलं! | माझा विशेष