पवई: पवईतील फिल्टर पाडा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. पवई फुलेनगर परिसरामध्ये एक युवक पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईच्या ऐन वस्ती भागातील ही घटना आहे पाण्याचा जोर जास्त असल्याने फिल्टर पाडा परिसरातील पवईत एक युवक पाण्यात वाहत जाताना दिसला. या तरुणाला पहिल्यांदा वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वाहत पुढे गेला त्यानंतर पुढे त्याला वाचवण्यात यश आलं आहे. 

Continues below advertisement


या व्हिडिओमध्ये तो तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहताना दिसतो, यावरून दिसून येते की पाण्याचा प्रभाव किती मोठा आहे. पाण्याच्या ठिकाणी कोणीही धोकादायक परिस्थितीत जाऊ नये, परिसरात देखील जाणं टाळावं असं सांगितलं असलं तरी काहीजण धोकादायक परिस्थितीतही जाताना दिसतात, अशातच या घटनेची चर्चा होताना दिसत आहे.


नेमकं काय घडलं?


पवई फिल्टर पाडा या ठिकाणी मिठी नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा आहे. या ठिकाणच्या रस्त्यावरून जाताना एक तरूण पाय घसरून पाण्याच्या प्रवाहामध्ये पडला. त्याने त्यावेळी एका भिंतीच्या सळईला पकडलं होतं, मात्र  पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने त्याच्या हातून सळई निसटली आणि तो पुढे वाहत गेला, पुढे त्याला वाचवण्यात यश आलं आहे. त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती आहे.


मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. महानगरपालिका प्रशासन देखील अलर्ट वर आहे. पाणी साचलेल्याअशा ठिकाणी किंवा मिठी नदीचा प्रवाह सुरू आहे, अशा ठिकाणी जाऊ नये असं सांगण्यात आला आहे. मात्र, हा तरुण तिथे जात होता, तो जात असताना अशाप्रकारे पाण्यामध्ये घसरला अशी प्राथमिक माहिती आहे मात्र त्याला वाचवण्यात यश आलं.



मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली


बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी ३.९ मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे ३५० नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगन नथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. तसेच आता समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी ३.९ मीटर वरून आता ३.६ मीटर इतकी झाली आहे. मुसळधार पावसाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.