मुंबई : सध्या मुंबईसह राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला, अजित पवार यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतल्यानंतर माहिती देताना म्हटलं की, मिठी नदीची पातळी वाढत चालली आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी कसं नेता येईल याचे नियोजन सुरु आहे. मुंबई, उपनगरे, पालघर, रत्नागिरी रेड अलर्ट जारी केला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सगळी यंत्रणा बारकाईने लक्ष ठेऊन
पुढे अजित पवार म्हणाले, 12 वाजता नवा रिपोर्ट येईल. राज्यभर पाऊस आहे, 10 लाख एकर क्षेत्र पाण्याखाली आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे सुरु करतोय असं सांगितलं आहे. नांदेडमध्ये सैनिकांना पाचाकरण केलंय. पाण्यामुळे काही गावं वेढली गेली आहे. गरजेचं असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन आहे. सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने घरी राहणं बरे पडेल. सातारा, कोल्हापूर, पुणे घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी केलेला आहे. पोलिस अलर्ट मोडवरती आहेत. सगळी यंत्रणा बारकाईने लक्ष ठेऊन आहे. 24 तासात लोकं आंघोळीला फक्त घरी जात आहेत. नाही तर सगळी यंत्रणा इथेच आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.
कॅबिनेट होणार आहे, रद्द होणार नाही
आजची कॅबिनेट बैठक होणार आहे, रद्द होणार नाहीये. राज्य सरकार 36 जिल्ह्यांत बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुंबई पालिकेनं सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मंत्रालयात काही लोकं येत आहे. 12च्या मिटिंगमध्ये पुढचा निर्णय होईल. मुंबईला सुट्टी जाहीर केली की मंत्रालयाला होते, मात्र तसा निर्णय झालेला नाही. आज कॅबिनेट आहे, मंत्री येऊ शकतील, ते येतील, अधिकारी इकडेच राहतात. पुढे काय करायचं हे समजून घेता येईल अशी माहिती देखील, अजित पवारांनी दिली आहे.
मुंबई उपनगरांत मागील 24 तासात अतिवृष्टीची नोंद
मुंबई उपनगरांत मागील 24 तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाला आहे.ही माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात अतिवृष्टी झाली आहे. पुढील 24तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. ठाणे- कळवा -मुंब्रा खाडीला भरतीला सुरुवात झाली आहे. सतत दोन दिवसात पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ठाण्याला लागूनच असणारा कळवा खाडी आणि मुंब्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाडीला भरतीला सुरुवात झाली असून खाडीकिनारी असणाऱ्या बोटीला प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत आज सरकारी-खासगी कार्यालयांना सुट्टी
भारतीय हवामान खात्याने आज, मंगळवार (19 ऑगस्ट 2025) रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी (मुंबई शहर व उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून, ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) तर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच महापालिका कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालये व आस्थापनांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षिततेसाठी घरात राहावे, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.