Police Recruitment: मुंबईचे (Mumbai) नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) हे सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. आज रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधून त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंबईकरांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुंबईकरांच्या विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी मुंबईतील ट्राफिक समस्या, पास्टपोर्ट मिळण्यास येणाऱ्या अडचणी या मुद्द्यांवर बोलतानाच इतर अनेक मुद्द्यांवर आपली मत मांडली आहेत. पोलीस आयुक्त लाईव्ह असतानाच मुंबईतील अनेक तरुणांसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी कमेंट्समध्ये संजय पांडे यांना आपल्या समस्या सांगितल्या आहेत. याच कमेंटमधील काही म्हत्वाचे प्रश्न आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत.          

  


पोलीस भरती कधी निघणार, तरुणांचा पोलीस आयुक्तांना प्रश्न


महाराष्ट्रात अनेक असे तरुण आहेत, जे गेले अनेक वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच अनेक तरुणांनी कमेंट्समध्ये महाराष्ट्रात पोलीस भरती कधी सुरू होणार, असा प्रश्न त्यांना विचारला आहे. तरुणाच्या या प्रश्नाला संजय पांडे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये उत्तर दिले नाही. असं असलं तरी पोलीस भरती जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार हा राज्य सरकारला असतो. याचा पोलीस आयुक्तांशी काही संबंध नसतो.  


किरकोळ रजा वाढवावी, पोलीस कर्मचाऱ्यांनी मांडल्या समस्या


संजय पांडे यांचे फेसबुक लाईव्ह सुरू असताना कमेंट्समध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनीही आपल्या समस्या मांडल्या आहेत. यात पोलीस कर्मचारी गोरखनाथ धोबड, मनीष अस्वले आणि इतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या समस्या मांडत किरकोळ रजा वाढवण्याची विनंती केली आहे. याबाबत कमेंट करताना किरण आव्हाड म्हणाले आहेत, ''सर महिलांसाठी 8 ड्युटी केल्याचा निर्णय अतिशय छान आहे. त्याच धर्तीवर 12 तास ड्युटीवर 24 तास ऑफचा निर्णय घेऊन पुरुष वर्गलाही न्याय द्यावा. आमच्या वरही जबाबदाऱ्या असतात. आम्हाला ही कुटुंबाला वेळ द्यायचा असतो.'' तर आणखी एका कमेंटमध्ये किरण आव्हाड म्हणाले आहेत की, किरकोळ रजा 12 दिवसावरून 20 दिवस व्हावी, वर्षभर 12 दिवस किरकोळ रजा पुरत नाही, म्हणून किरकोळ रजा वाढवावी अशी विनंती त्यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केली आहे.


दरम्यान, या फेसबुक लाईव्हमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना आवाहन करत संजय पांडे म्हणाले आहेत की, तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही कधी त्या माझ्या समोर मांडू शकता. मात्र त्याआधी याची कल्पना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले आहेत.  


संबंधित बातम्या: