परदेश (Passport) प्रवासासाठी पासपोर्ट हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज आहे. भारताबाहेर ओळखपत्र म्हणून पासपोर्ट हे एकमेव कागदपत्र म्हणून वापरले जाऊ शकते. पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केल्यानंतर, या प्रक्रियेचा एक टप्पा म्हणजे पोलिस पडताळणी. त्याशिवाय कोणाचाही पासपोर्ट मिळणे अशक्य आहे. मात्र असं असलं तरी तुम्हाला पासपोर्ट मिळणं किंवा न मिळणं हे पोलिसांच्या हातात नाही, असं मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) म्हणाले आहेत. रविवारी फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून नागरिकांशी संवाद साधना ते असे म्हणाले आहेत.


यावेळी पासपोर्टबद्दल बोलताना संजय पांडे म्हणाले आहेत की, ''पास्टपोर्ट हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पासपोर्ट जारी करणे आणि त्याचे नूतनीकरण करणे, हे काम पासपोर्ट कार्यालयाचे आहे. आम्ही फक्त पडताळणीसाठी त्यांना मदत करतो. तुम्हाला पासपोर्ट द्यायचा की नाही, याचा कोणताही अधिकार पोलिसांना नाही. ही पडताळणी तुमच्या कागदपत्रांशी संबधित असते. तसेच तुमची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही, तुमच्यावर कोणतेही गंभर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे की नाही, याची आम्ही तपासणी करतो. म्हणून तुम्हाला पासपोर्ट नाकारण्यात आले, तर आम्हाला दोष देऊ नका. कारण तुम्हाला पासपोर्ट द्यायचा किंवा नाही, याचा अधिकार फक्त पासपोर्ट कार्यालयाला आहे, आम्हाला नाही'', असं ते म्हणाले आहेत.           


पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही


दरम्यान, याआधी मुंबई पोलीस आयुक्तांची ट्वीट करत मुंबईकरांना पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. याबाबत ट्वीट करत ते म्हणाले होते की, यापुढे पासपोर्टच्या पडताळणीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातून कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येणार आहे. एखाद्या पोलीस ठाण्याकडून या नियमाचं पालन करण्यात आलं नाही, तर याबाबत तक्रार ही करू शकता, असं ही ते म्हणाले होते. असं असलं तरी पासपोर्टची काही कागदपत्रं अपूर्ण असतील तर मात्र अर्जदारांना पोलीस ठाण्यात हजर रहावं लागणार असल्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.  


संबंधित बातम्या: