मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 हा महत्वकांक्षी उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागामार्फत मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी हा कार्यक्रम उपयुक्त असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. एमएमआरडीए मैदानात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र -कन्व्हर्जन्स 2018 चं उद्‍घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.


मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रमुख उद्दीष्ट

  • या कार्यक्रमाच्या माध्यमातून 10 लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे

  • या कार्यक्रमात 4500 सामंजस्य करार होणार आहेत

  • विविध क्षेत्रात 35 लाख रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

  • अवकाश आणि संरक्षण उत्पादन, वस्त्रोद्योग, इ-व्हेईकल्स, खाद्यान्न प्रक्रिया आणि लघु व मध्यम उद्योग या क्षेत्रांवर विशेष भर


उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

या जागतिक परिषदेला रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि महिंद्राचे आनंद महिंद्रा यांच्याखेरीज विदेशी उद्योजकांची उपस्थिती विशेष ठरणार आहे. व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन, इमर्सनचे एडवर्ड मॉन्सर, जगप्रसिद्ध कार कंपनीचे टोनिनो लॅम्बोर्घिनी यांची मुख्य उपस्थिती असेल.

यासोबतच स्वीडनचे सचिव कॅरीन रोडिंग, कॅनडाचे लघु उद्योग मंत्री बार्दिश चॅग्गर तसेच नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत हे उपस्थित असतील.

राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018 या परिषदेत दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञान, निर्यात यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील 47 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 कार्यक्रमाचं स्वरुपः

18 फेब्रुवारी :

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंड येथे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित या परिषदेचं उद्‍घाटन 18 फेब्रुवारीला सायंकाळी 5.45 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. तर प्रदर्शनाचं उद्घाटन 7.15 मिनिटांनी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री उपस्थित असतील. याच दिवशी मोठ्या कंपन्यांच्या निवडक सीईओंसह पंतप्रधान चर्चा करणार आहेत. सायंकाळी 7.45 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

19 फेब्रुवारी :

सकाळी 10 वाजल्यापासून विविध चर्चासत्रांना सुरुवात होणार आहे. यात प्रामुख्याने फ्युचर इंडस्ट्री, सस्टेनेबिलीटी, एम्प्लॉयमेंट आणि इंफ्रास्ट्रक्चर या विषयांवर चर्चा होणार आहे. यात नवे तंत्रज्ञान, स्मार्ट सिटीज, निर्यात, सप्लाय चेनसह ‘जर्नी टू ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी’ हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद होणार आहे. सायंकाळी स्टार्टअप पुरस्कार आणि उद्योगरत्न पुरस्कार रजनी होणार आहे.

20 फेब्रुवारी :

सकाळी 10 वाजल्यापासून तीन हॉलमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र होणार आहेत. यात जलसंधारण, महिला उद्योगधोरण, इज आफ डुईंग बिझनेस, मुंबई फायनान्शियल हब, मेक इन महाराष्ट्र 2.0 यांचा समावेश आहे. सायंकाळी 4.30 वाजता परिषदेचा सांगता समारंभ होईल.