मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते नवी मुंबई इथल्या आंतरराष्टीय विमानतळाचं भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं मॅग्नेटिक महाराष्ट्राचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर मोदी उपस्थितांनाही संबोधित करणार आहेत.

दुसरीकडे या संपूर्ण कार्यक्रमात शिवसेनेला मात्र डावलण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार नाहीत.

शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याचा आरोप करत विमानतळ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच स्थानिक शिवसैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेधही व्यक्त करणार आहेत.

सेना-भाजपमधील धुसफूस

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत जाहीर केले की, आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र मध्यंतरी भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेसाठी शिवसेनाला 140 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. त्यामुळे भाजपने सेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात होते. मात्र जागांच्या प्रस्तावाच्या वृत्त सेनेने फेटाळले.

शिवेसेना आणि भाजप हे दोन्ही पक्षा राज्य आणि केंद्रातील सत्तेत एकत्र नांदत असले, तरी त्यांच्या नांदण्यात आनंददायी नातं आहे, अशातला भाग नाही. कारण दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी कायमच एकमेकांवर टीका केली आहे.

आज (रविवार) नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला येणार आहेत. याच कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याचे कारण देत शिवसेनेने त्यावर बहिष्कार टाकला आहे.

संबंधित बातम्या :
नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनावर शिवसेनेचा बहिष्कार

17