मुंबई: डिवाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॅपर विवियान फरनांडीस याचा जीवनपट गली बॉय नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील ‘अपना टाईम आएगा’ हे गाणं जवळजवळ सर्वच तरुणांच्या प्लेलिस्टवर सुरु असतं, अशा या मोस्ट फेवरेट गाण्याचं पश्चिम रेल्वेने रिमेक केलं आहे. ‘तू बिना टिकीट आया है तो पकडा जरुर जाएगा’ असे शब्दप्रयोग करुन पश्चिम रेल्वेने ट्विटरपेजवर मोफत रेल्वेप्रवास करणाऱ्या प्रवाशांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे.

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे आणि याचा फटका भारतीय रेल्वेला बसतो. हीच बाब लक्षात घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने ‘अपना टाईम आएगा’ गाण्याचं रिमेक करुन ‘तेरा टाईम आएगा’ असा व्हिडीओ शेअर केला आहे.


तिकीट न काढता प्रवास करणे फक्त प्रवाशांनाच नाही तर टीसींनाही त्रासदायक आहे. काल कसारा उंबरमाळी स्थानकादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा पाठलाग करताना रेल्वे रुळावर पडून टीसीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही पहिलीच घटना नसून अशा अनेक अपघातांमध्ये टीसी, प्रवाशांनी त्यांचे प्राण गमावले आहेत.

पश्चिम रेल्वेला या व्हिडीओमार्फत जो मेसेज द्यायचा आहे तो साध्य होताना दिसत आहे. कारण या व्हिडीओला मुंबईकरांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओनंतर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होईल अशी आशा पश्चिम रेल्वेला आहे.