यावेळी शिवाजी पार्क समर्थ व्यायाम मंदिराचे प्रमुख आणि मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी पुण्यातील बुद्धिबळ खेळाडू सलोनी सापळे आणि स्कॉश खेळाडू महेश जोशी यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या दोन शहीदांना मदत म्हणून दिली. पुलवामा मध्ये झालेला हल्ला हा अतिशय दुर्दैवी असून यामुळे सर्व भारतीयांची मन सुन्न झाली आहेत. त्यांना मदत म्हणून आपल्या पुरस्काराची लाख 2 हजार रुपये देत असल्याचे पुण्याची बुद्धिबळपट्टू सलोनी सापळे आणि स्कॉश खेळाडू महेश जोशी यांनी सांगितले.
क्रीडापटूंना मेहनतीने आणि सज्जतेने सहभागी होण्याचे आवाहन
राज्यपाल सी. विद्यासागर राव यावेळी म्हणाले की, खेळांप्रति महत्वाकांक्षा, वचनबद्धता आणि निराकरण क्षमता असल्यास आपण खेळ विश्वातील सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो. पुढच्या वर्षी टोकियोमध्ये ऑलिंपिक गेम आणि पुढील दोन वर्षात आशिया गेम्स चीनमधील हुआंगझूमध्ये होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतातील क्रीडापटूंना मेहनतीने आणि सज्जतेने सहभागी होण्याचे आवाहन राज्यापल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी केले. येणाऱ्या काळात तरुण व आश्वासक खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी निवृत्त खेळाडूंची क्षमता वापरली जाणे आवश्यक असल्याचे श्री. राव यांनी सांगितले. आपली सर्वात मोठी ताकद हे आपले समर्पित प्रशिक्षक आणि सेवानिवृत्त खेळाडू आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी देशाला आणि राष्ट्राला अभिमान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या खेळाडू, खेळाडू प्रशिक्षक, क्रीडा कार्यकर्ते, दिव्यांग खेळाडु यांप्रति अभिमान व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातल्या सर्वच तरुण खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यात महाराष्ट्र क्रीडा आणि खेळांमध्ये आपले नेतृत्व सिद्ध करेल, अशी आशा व्यक्त केली. मंत्री तावडे यावेळी म्हणाले की, राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. पालक मुलांना खेळामध्ये करीअर करु देण्यास सहज तयार होत नाहीत. पण अलीकडच्या काळात पालकांचाही क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. आज विदयार्थ्यांनी खेळात चांगले प्रावीण्य मिळविले तर तो विदयार्थी भविष्यात खेळामध्येच चांगले करीअर करु शकतो. शारीरिक कौशल्ये आणि क्षमता भरपूर असलेल्या मुलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. नव्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता असते. क्रीडा मंत्री म्हणून मला सांगण्यास आनंद वाटतो की,आज महाराष्ट्रात चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी राज्य सरकार क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याबरोबरच खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार शासकीय सेवेत थेट नियुक्तीही देण्यात येत असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. सन 2017-18 या वर्षांतले शिवछत्रपती पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना जीवगौरव पुरस्कार तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांच्यासह खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात आले. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 15 जणांना वितरीत करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स), सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील, पुणे ॲथलेटिक्स, मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुध्दीबळ), संजय बबन माने (कुस्ती), डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी), उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वोंदो), बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो), स्वप्नील सुनील धोपाडे (बुध्दीबळ), निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन), सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन), दिपाली महेंद्र पाटील (सायकलिंग), पोपट महादेव पाटील (कबड्डी), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग), डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो).