गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेची युतीची बोलणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या पत्रकार परिषदेला अमित शाह येण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्या येण्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. कारण दिवसभारात शाह यांचे अनेक नियोजित कार्यक्रम आहेत. मात्र युतीची बोलणी दिवसभर सकारात्मक राहिली तर संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेला अमित शाह नक्की येतील, असं बोललं जात आहे.
युती व्हावी यासाठी भाजपने एक पाऊल मागे घेतलं आहे. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेसाठी अडून बसलेल्या पालघरच्या जागेवरही पाणी सोडलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच विधानसभेसाठी शिवसेनेची 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचं कळत आहे. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी 144-144 जागांवर लढणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. मात्र शिवसेनेने गेल्या काही महिन्यापासून आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेच्या नेत्यांची सोडली नव्हती. याच आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा मिळाल्याचं दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा