मुंबई : सर्वांचं लक्ष लागून राहिलेला मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात दरवर्षीच्या तुलनेत लवकर दाखल झाला. आजपर्यंत मान्सूननं विदर्भापर्यंत मजल मारली आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) जारी केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात (Monsoon Arrived in Vidarbha) विदर्भापर्यंत मान्सून पोहोचला आहे. दुसरीकडे संपूर्ण तेलंगणा राज्यात मान्सून दाखल झाला आहे. छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. 


मान्सून कुठंपर्यंत पोहोचला?


भारतीय हवामान विभागानं  मान्सूननं कुठंपर्यंत प्रवास केला आहे याची माहिती दिली. हवामान विभागानं जारी केलेल्या नकाशानुसार  नैऋत्य मोसमी वारे  महाराष्ट्रात विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. गुजरातमधील नवसारी, महाराष्ट्रात जळगाव, अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत मान्सून दाखल झाला आहे. तेलंगणामध्ये सर्व राज्यभरात मान्सूनचं आगमन झालं आहे. छत्तीसगडमध्येही मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. बिजापूर, सुकमा मलकनगिरी, विझिंग्राम आणि इस्लामपूर जवळ मान्सून पोहोचला आहे.  


के.एस. होसाळीकर यांचं ट्विट






हिंगोलीत दमदार पावसाची हजेरी, वीज पडून एकाचा मृत्यू 


हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल जोरदार पाऊस झाला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटा सह झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील चार महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हिंगोली, बासंबा, सिरसम आणि माळहिवरा या चार महसुली मंडळाचा समावेश आहे.  पहिल्याच पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील कायाधू नदी सुद्धा प्रवाहित झाली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 28 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे 


कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील शेतकरी गोविंद किशन कदम हे शेतामध्ये वैरण जमा करत असताना अचानक अंगावर वीज पडली आणि यामध्ये गोविंद कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


यवतमाळमध्येही पावसाची दमदार हजेरी  


यवतमाळ जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस बरसला. पुसद, रुंझा, डोंगरखर्डा, कळंब, हिवरी, हिवरी संगम, सवना, महागाव, महागाव कसबा आणि बाभूळगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. नाकापार्डी येथे  वादळी पावसाने अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली. यात 50 ते 60 घरांवरील छप्पर उडून गेले. यात धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी लागवडीसाठी आणलेल्या बियाणे, खते याचेही नुकसान झाले. नुकसान झालेल्या घरांचा सर्व्हे करण्यात आला असून आपत्ती विभागाकडून नुकसानीसाठी मदत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 


दरम्यान,  दक्षिण  कोकण आणि गोव्याच्या काही भागांवर ढगांचा पट्टा पसरलेला आहे. सोलापूरमध्येही ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलका पाऊस येऊ शकतो. 


संबंधित बातम्या :


राज्यात मान्सूनची एन्ट्री, तर विदर्भातील अनेक तलावांनी गाठला तळ; मान्सूनच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा


Vidarbha Weather Update : विदर्भात मान्सून पूर्व पावसाचा हाहाकार! नदी नाल्यांना पूर, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू