मुंबई : मुंबईच्या आकाशात दोन विमानांची टक्कर टळल्यामुळे सुदैवाने संभाव्य अपघात घडला नाही. एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाईन्सचं विमान एकमेकांच्या जवळ आल्यामुळे हा आकाशात मोठा अपघात घडला असता. 261 प्रवाशांचे प्राण या संभाव्य अपघातातून बचावले आहेत.


काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी विमान अपघात अन्वेषण विभाग (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो - एएआयबी) ने चौकशीचे आदेश दिले आहेत.

7 फेब्रुवारी विस्तारा एअरलाईन्सचं UK 997 हे विमान 152 प्रवाशांसह दिल्लीहून पुण्याला जात होतं. त्याचवेळी एअर इंडियाच्या भोपाळला निघालेल्या AI 631 या विमानाने 109 प्रवाशांसह उड्डाण केलं. विस्ताराचं विमान एअर इंडियापासून अवघ्या 100 फूट अंतरावर आल्यामुळे मोठा अपघात घडला असता.

एअर इंडियाच्या कॅप्टनने तिच्या अहवालात विस्ताराचं विमान अवघ्या 100 फुटांवर असल्याचं लिहिलं आहे. ऑटोमॅटिक वॉर्निंगमुळे पायलटला याची माहिती मिळाली. त्यानंतर विमान सुरक्षित अंतरावर नेण्यात आल्यामुळे अपघात टळला.

विस्तारा एअरलाईन्सच्या दोन पायलट्सना उड्डाण करण्यापासून वंचित (ऑफ फ्लाईंग ड्यूटी) ठेवण्यात आलं आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. एअर इंडियाच्या वैमानिकांची चूक नसल्यामुळे एएआयबीने त्यांना हिरवा कंदील दाखवला आहे.

एअर इंडियाचं विमान एटीसी (एअर ट्राफिक कंट्रोल)च्या सूचनांनुसार जात होतं. कोणतीही द्विधा परिस्थिती नव्हती. मात्र विस्ताराच्या पायलटचा काहीतरी गोंधळ झाला आणि एटीसीच्या वेगळ्या सूचना असतानाही त्यांचं विमान खाली येत राहिलं, असं एअर इंडियातर्फे सांगण्यात आलं.